मुंबई- भारतावर इंग्रजांचे राज्य असताना शहरात अनेक इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यापैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेच्या इमारतीमधील कलाकुसरीचा आनंद पर्यटकांना घेता यावा म्हणून पालिका मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाला दिल्या आहेत. पर्यटन विभागाने यावर निर्णय घेतल्यानंतर पर्यटन सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई महापालिका मुख्यालयाची इंग्रजी 'व्ही शेप' आकाराची ब्रिटिशकालीन इमारत आहे. १८९४ मध्ये ही इमारत बांधण्यात आली असून ती गॉथिक वास्तुकलेच्या शैलीचा उत्तम नमुना आहे. या इमारतीने शहराच्या वैभवात भर घातली असून ही इमारत शहराची ओळख बनली आहे. ही इमारत पाहण्यासाठी केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक येतात. पालिका मुख्यालयात कामकाज सुरू असल्याने पर्यटकांना इमारतीच्या आत जाऊन इमारतीचे सौंदर्य न्याहाळणे किवा छायाचित्रण करणे शक्य होत नाही. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉइंटवरूनच पर्यटकांना या इमारतीचे दर्शन घ्यावे लागते.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका कामकाजाशी संबंधित अनेक बैठका पालिका मुख्यालयात घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना देखील मुख्यालयाच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाने भुरळ घातली. पर्यटनमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तश्या सूचना देखील पर्यटन विभागाला दिल्या आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पालिकेला सुट्टी असल्याने याच दिवशी पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन विभाग यावर विचार करीत असून लवकरच पर्यटन सुरू करण्यात येणार आहे.