महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Big Breaking : मीरा रोडमध्ये मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू - अग्निशामक दल - आषाढी यात्रा बातमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 20, 2021, 6:46 AM IST

Updated : Jul 20, 2021, 8:55 PM IST

20:50 July 20

बीड रेडिओ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद - बीड रेडिओ येथील 2012मधील रेडिओ बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी आबा गिरी याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. २०१२मध्ये बीड जिल्ह्यात एसटी बसमध्ये रेडिओ बॉम्ब फुटून एसटीचा कंडक्टर व त्याच्या घरातील तिघे जखमी झाले होते. कंडक्टर ओम निंबाळकर याला एसटी बसमध्ये एक बेवारस पार्सल सापडले होते. हे पार्सल तो घरी घेऊन गेल्यानंतर त्यात रेडिओ होता. रेडिओत सेल टाकल्यानंतर लगेच स्फोट झाला होता.

19:30 July 20

मुंबई विमानतळाचे मुख्यालय हलविणार नाही, अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण

मुंबई -मुंबई विमानतळाचे मुख्य कार्यालय मुंबईतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण अदानी ग्रुपकडून देण्यात आले आहे. हे कार्यालय अहमदाबादला हलवण्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपने ट्विटच्या माध्यमातून हे स्पष्ट केले आहे. 

18:43 July 20

गर्भपाताच्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात 14 गुन्हे दाखल

मुंबई -गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दिनांक 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत अचानक तपासणी व धाडीची धडक मोहीम राबविली. एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून 11 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती, औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त दा. रा. गहाणे यांनी दिली.

18:41 July 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुंबई -कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी बकरी ईद सण घरीच राहून साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोरोनाकाळात आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

17:54 July 20

शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यास 2 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता

मुंबई -शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवडय़ात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.

17:43 July 20

अधिवेशनाच्या एक दिवशी आधी पेगॅससची रिपोर्ट येणं हा लोकशाहीला बदनाम करण्याचा कट - देवेंद्र फडणवीस

मुंबई -पेगॅससच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले. अधिवेशनाच्या एक दिवशी आधी अशी बातमी देऊन लोकशाहीला बदनाम करण्याचा कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

17:05 July 20

केंद्राकडून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न - सचिन सावंत

मुंबई -गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबई विमानतळावर ज्याप्रकारे गरबा नृत्य झाले, हा दुर्दैवी प्रकार यापूर्वी कधीही झाला नाही. महाराष्ट्रातील जनेतेचे लवकरच डोळे उघडतील, असे ते म्हणाले. 

16:29 July 20

महापौर किशोरी पेडणेकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. 

16:24 July 20

घरोघरी लसीकरणाबाबतची गाइडलाइन अजून तयार नाही - सुरेश काकाणी

मुंबई -6 महिन्याच्या वर घरात बेडवर आहेत, त्यांनाच घरी लस दिली जाणार आहे. बेडवर असलेल्या नागरिकांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. याबाबत राज्य सरकार गाइडलाइन बनवत आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची म्हटले आहे. 

15:49 July 20

मुंबईत 1 ऑगस्टपासून घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणास होणार सुरूवात

मुंबई - ज्येष्ठ नागरिकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचे धोरण तयार झाले असून अंतिम मसूदा लवकरच जाहीर करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. केंद्र सरकारला याबाबतीत अजूनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार जागे झाले याचे समाधान असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत 1 ऑगस्टपासून घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणास सुरूवात होणार आहे.

15:47 July 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरवरून मुंबईच्या दिशेने रवाना

पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरवरून मुंबईच्या दिशेने स्वतः गाडी चालवत रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर हेही रवाना झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानाचे वारकरी केशव कोलते यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची महापूजा केली.

15:10 July 20

राज कुंद्रा आणि त्यांच्या साथीदारास 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - या गुन्ह्यातील बरीचशी कलमे जामिन मिळण्यासारखी आहेत, त्यामुळे कुंद्रा यांना कोठडी देऊ नये असे कुंद्रा यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. तर या गुन्ह्यात बरचसे फॉरेन ट्रान्झॅक्शन सापडले असल्याने ते तपासण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

15:07 July 20

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल

नागपूर -ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल झाला आहे. सध्या अमरावती रोड, गोंडखैरी येथे तो असून सायंकाळपर्यंत दाखल होणार आहे.

15:04 July 20

साई समाधीजवळ विठ्ठलाची प्रतिमा ठेवत प्रतिमेचे पूजन

शिर्डी - साईबाबांच्या शिर्डीत आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावात साई संस्थानच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने साईबाबांच्या मुर्तीला आणि समाधीवर तुळशी पत्राची माळ घालण्यात आली. आज दिवसभर साई समाधीजवळ विठ्ठलाची प्रतिमा ठेवत या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.

12:21 July 20

शरद पवार, मुख्यमंत्री अन् बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य, त्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही - बावनकुळे

नाशिक -शरद पवार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य आहेत, त्यांना 2022 पर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजप नेते चंद्रकांत बावकुळे यांनी केला आहे. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलतात, छगन भुजबळ मोर्चे काढतात. पण, मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार बोलत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील तयार झालेल्या डेटामध्ये 69 लाख चुका आहेत. हा डेटा राज्य सरकारने नव्याने तयार करावा. छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा, भाजप त्यांना नक्की मदत करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

10:06 July 20

कोल्हापूर : परिते येथे गर्भलिंग करणाऱ्या घरावर छापा, पाच जणांना अटक

माहिती देताना पोलीस उपअधीक्षक

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील परिते या ठिकाणी एका खोलीत बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाक पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राणी कांबळे ही पोलिसांचा छापा पडताच मागच्या दाराने पसार झाली असून तिच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

09:53 July 20

Pegasus spyware हेरगिरीबाबत मोदी सरकाने जनतेला स्पष्टीकरण द्यावे - सुब्रमण्यम स्वामी

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्वीट

नवी दिल्ली - पेगासस स्पायवेयर ही व्यवसायीक कंपनी आहे. ही कंपनी सशुल्क काम करते. या कंपनीला हेरगिरी करण्यासाठी जर भारत सरकारने पैसे दिले नाही तर कोणी दिले, याबाबत भारतातील जनतेला स्पष्टीकरण देणे हे मोदी सरकरने कर्तव्य आहे, असे ट्वीट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

08:58 July 20

ठाणे : दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे निलंबन तर दोन सहायक पोलीस आयुक्तांची बदली

ठाणे- वर्तकनगर व नौपाडा परिसरात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशीरा डान्स बार सुरू होते. याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले असून दोन सहायक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. 

06:18 July 20

मीरा रोड परिसरात एका मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू, अग्निशामक दलाची माहिती

मुंबई -राज्यात मुंबई, ठाणेसह कोकणात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मीरा रोड परिसरातील एका नाल्यात दहा वर्षीय मुलगा वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू असताना मृतदेह सापडला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

Last Updated : Jul 20, 2021, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details