मुंबई : नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराच्या मंदिराचे बांधकाम आजपासून सुरू झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस याच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य असलेले मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मंदिरासाठी भूसंपादन करण्यात आले होते. श्री व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी शहर पातळीवरील सुविधा म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत जमीन देण्यात आली होती. उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे हे मंदिर उभारले जाणार आहे.
मंदिर तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती : तिरुमाला तिरुपती देवस्थानम मंडळाद्वारे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाणार आहे. हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती असणार आहे. देवाची मूर्ती देखील तशीच राहणार आहे. भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी हे मंदिर आकर्षण ठरेल त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दररोज 5 हजार भाविकांना दर्शन घेत येणार आहे तसेच महाप्रसादाची सोय देखील केली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या काळात झाले होते भूसंपादन : नवी मुंबईतील उलवे नोड परिसरातील 10 एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मंदिरासाठी जमीन देण्यात आली होती. नगरविकास खात्याने विशेष प्रकल्प म्हणून या जमिनीचे संपादन केले आणि टीटीडीला जमीन हस्तांतर केली. या जमिनीचे कागदपत्रे स्वत: आदित्य ठाकरे यांनी तिरुपतीला जाऊन देवस्थान विश्वस्त समितीकडे सुपूर्द केली होती. दरम्यान आज या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली आहे. मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
10 एकरात उभारले जाणार मंदिर :महाराष्ट्र सरकारने 500 कोटी रुपयांची जागा या मंदिराच्या उभारणीसाठी दिली आहे. टीटीडीने 27 फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात देवस्थान बांधण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला होता. त्यांचा तो प्रस्ताव मान्य केल्यानंतर भूखंडाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी नवी मुंबईच्या उलवे नोड विमानतळ परिसरातली निसर्गरम्य ठिकाण देवस्थान विश्वस्तांना आवडले. त्यानंतर त्यांनी ही जागा मंदिरासाठी मागितली. साधरण 10 एकर जागेवर हे मंदिर उभारले जाणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी 70कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. देशातील प्रत्येक सामान्य व्यक्ती आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानाला जाऊ शकत नाही. यामुळे टीटीडीमार्फत देशभरत प्रतितिरुपती देवस्थाने उभारली जातात. तिरुपती बालाजीला ज्या सोयी-सुविधा मिळतात त्याच सोयी या प्रतितिरुपती बालाजी मंदिरात पुरवल्या जातात. मुंबईतील मंदिरातही अशाच सुविधा दिल्या जाणार आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री : भूमीपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तिरुपती बालाजी देवस्थानला या ठिकाणी 10 एकर जमीन देण्याचे भाग्य आपल्या सगळ्यांना लाभले. आपण सगळे भाग्यशाली आहे आज आनंदाचा दिवस आहे. तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच येथे मंदिर बांधले जाणार आहे. ही राज्यासाठी मोठ्या गौरवाची बाब आहे. सर्वांना तिरुपतीला जायचे असते, पण तिकडे सर्वजण जाऊ शकत नाहीत.आता प्रत्येकाला बालाजीचे दर्शन होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वांना तिरुपती बालाजीचे आशीर्वाद लाभतील. आमच्या सरकारच्या माध्यमातून सर्व सहकार्य करू. चांगले काम व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. तुम्ही महाराष्ट्रात मंदिर बनवण्याचा संकल्प केला हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हेही वाचा -
- TTD in Mumbai : नवी मुंबईत बांधले जाणार तिरुपती बालाजी मंदिर, भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण
- Prabhas visits Tirupati Balaji temple : आदिपुरुष प्री-रिलीज इव्हेंट पूर्वी प्रभासची तिरुपती बालाजी मंदिराला भेट