मुंबई -टाळेबंदीनंतर नशेखोर कंगाल झाले आहे. त्यांना नशेसाठी लागणाऱ्या अंमली पदार्थाची खरेदी करणे परवडत नसल्याने ते 'नर्वस सिस्टिम’ प्रभावित करणाऱ्या विविध औषधांकडे वळले आहेत. अशीच औषधे घेऊन जाणाऱ्या दोघांकडून तब्बल 17 हजार 700 गोळ्यांचे पाकीटे पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी दोघांना चेंबूरच्या टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नौशाद तौफिक खान आणि शाहिद मोहम्मद शरिफ खान, असे त्या दोघांचे नाव आहे.
मुंबईच्या चेंबूर परिसरात स्वराज्य इमारतीजवळून नौशाद व शाहिद हे दोघे जात होते. कडक निर्बंध असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस विविध ठिकाणी कारवाई करत आहेत. अशात शुक्रवारी (दि. 7 मे) सायंकाळी या दोघांची दुचाकी पोलिसांनी थांबवली. यातील एकाकडे मोठ-मोठे बॉक्स असल्याने पोलिसांनी त्याची दुचाकी थांबवली. बॉक्समधील औषधांबाबत त्यांना विचारणा केली असता. दोघांनी पोलिसांना असमाधान कारक उत्तर दिली. पोलिसांचा या दोघांवर संशय बळावल्याने दोघांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी या दोघांकडे असलेल्या बॉक्समध्ये 17 हजार 700 गोळ्यांची पाकिटे आढळून आली.