ठाणे -कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला समोर असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून लगतच्या झोपड्यांवर पडल्याने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये मध्ये २ महिला आणि एक ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
शोभा कांबळे (वय ६०), करीना मोहम्मद चंद (वय २५) आणि हुसेन मोहम्मद चंद (वय ३), असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, आरती राजू कर्डीले वय १६ असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याणमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू गेल्या चार-पाच दिवसांपासून कोकण पट्ट्यात पावसाने हाहाकार माजला आहे. पुणे मुंबई पाठोपाठ कल्याणातील एका शाळेची संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच कल्याण डबल महापालिकेच्या बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह काढले. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या जागेत ऐतिहासिक भटाळे तलाव असून या तलावात मातीचा भराव टाकून स्थानिक भूमाफियांनी याठिकाणी अनाधिकृत झोपड्या महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उभारल्याचे बोलले जात आहे. तर, या परिसरात पालिकेचे अनधिकृत नियंत्रण पथकातील अधिकारी कारवाईसाठी येऊ नये म्हणून या भूमाफियांनी सभोवती पत्र्याच्या कंपाउंड उभारण्यात आले आहे.
खळबळजनक बाब म्हणजे घटना घडल्यानंतर चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना येथील स्थानिक भूमाफियांनी मज्जाव केला आहे. तर, दुसरीकडे या शाळेच्या भोवती उभारण्यात आलेल्या असंख्य अनधिकृत बांधकामावर यापुढेही आज सारखेच संकट कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता तरी पालिका अधिकारी भटाळे तलावात मातीचा भराव टाकून उभारण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करणार का? असा सवाल या दुर्घटनेमुळे उपस्थित झाला आहे.