मुंबई :मुंबईच्या पालिका उद्यानात रुद्राक्षाची झाडे पहायला मिळाली आहेत. रुद्राक्षाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. रुद्राक्षांच्या माळा, लॉकेट बनवले जाते. त्यापासून विविध आभूषणे बनवली जातात. ती घातली जातात. जप करण्यासाठीही रुद्राक्षाच्या माळा वापरल्या जातात. अशा या रुद्राक्षाची २ झाडे पालिकेच्या उद्यान विभागाने वरळी सी फेस येथे आद्य शंकराचार्य उद्यानात २०१७ मध्ये लावली होती. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ही झाडे लावली होती. या झाडांची उद्यान विभाग गेली पाच ते सहा वर्षे काळजी घेत आहे.
झाडे, बियांचे जतन :मुंबईच्या पालिकाउद्यानात लावलेल्या रुद्राक्षाच्या झाडांना फलधारणा झाली आहे. या झाडांवर सुमारे ३० ते ४० रुद्राक्षांची फळे आली आहेत. या फळाच्या आत तीन मुखी रुद्राक्ष आहेत. रुद्राक्षच्या फळामधील बिया धर्मकार्यात वापरल्या जातात. या वृक्षाला वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना या झाडाचा अभ्यास करता यावा यासाठी त्याचे जतन केले जात आहे. रुद्राक्ष फळामधील बिया जतन केल्या जाणार असून त्यापासून आणखी झाडांची लागवड करता येते का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.