मुंबई Mumbai Airport Threat Email : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट (Mumbai Airport Bomb Threat Email) घडवून आणण्याची धमकी देणारा मेल करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने तिरुवनंतपुरममधून (Mumbai ATS) अटक केली असल्याची माहिती एटीएस प्रमुख सदानंद दाते (ATS Chief Sadanand Date) यांनी दिली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३८५ आणि ५०५ (१) (बी) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. दरम्यान, एटीएसने तपासाची चक्रे जोरदार फिरवून आरोपीच्या मुसक्या तिरुवनंतपुरममधून (Thiruvananthapuram) आवळल्या आहेत.
प्रकरणाचा सखोल तपास :मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला होता. बॉम्बस्फोट टाळण्यासाठी 48 तासात 10 लाख डॉलर भरण्याची मागणी मेल पाठवणाऱ्याने केली होती आणि तेही बिटकॉइनमध्ये, असे मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. यानंतर मुंबई पोलीस आणि 'एटीएस'ने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता.
काय दिली होती धमकी? : सहार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “quaidacasrol@gmail.com” या ईमेल आयडीचा वापर करून धमकीचा ईमेल आला होता. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने आज सकाळी 11 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता. धमकीच्या मेलमध्ये आरोपीने लिहिले होते की, 'तुमच्या विमानतळासाठी ही शेवटचा इशारा आहे. जर असे झाले नाही तर आम्ही 48 तासांच्या आत विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू, जर असे घडवायचे नसेल तर आम्हाला Bitcoin मध्ये 10 लाख डॉलर्स पाठवा आणि 24 तासांनंतर दुसरी सूचना दिली जाईल'.