मुंबई -कोरोनाचे महासंकट पाहता केंद्र सरकारने मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. या कालावधीत कारखाने आणि वाहतूक बंद होती. यामुळे हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. मात्र, 'अनलॉक'मध्ये आता पुन्हा कारखाने आणि वाहतूक सुरू झाली आहे. हे पाहता प्रदूषणात झालेली घट आणि चांगल्या हवेची स्थिती कायम ठेवायची असेल तर पर्यावरणीय धोरणात्मक बदल करण्याची हीच अचूक वेळ आहे, असे मत हवामान अभ्यासक भगवान केशभट यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.
काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी 2020 पर्यंत मुंबई शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दिल्लीनंतर वायुप्रदूषणात मुंबईचा नंबर लागतो का? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, मार्च महिन्यानंतर तीन महिने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वायू प्रदूषण मोठया प्रमाणात घटले. याच कालावधीत मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील प्रदूषण कमी होऊन वातावरण शुद्ध झाले आहे. तसेच हवेची गुणवत्ताही सामान्य झाली आहे.
यामुळे अनेक प्राणीदेखील रस्त्यावर दिसले होते. तर वायू प्रदूषणाबरोबर सागरी प्रदूषणदेखील कमी झाले. यामुळे मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्याची ही मोठी संधी आहे. ही स्थिती कायम ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना आताच राबवणे गरजेचे आहे. आता योग्य पाऊले उचलली तर वायू प्रदूषण कमी होऊ शकते, यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले.