मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांना प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी विविध ठिकाणी ‘जम्बो कोविड केंद्र’ सुरु केले आहेत. या ठिकाणी सुमारे ७ हजार ६५० बेड उपलब्ध असून साधारणपणे १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारीही कार्यरत आहेत. आता पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये ११ खासगी रुग्णांलयामधील ३५ तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटी हे डॉक्टर आपली सेवा देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
जम्बो कोविड सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील ३५ तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार - suresh kakani news
कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने शहरात जम्बो कोविड सेंटर उभारली आहेत.जसलोक, भाटिया रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय, ब्रिच कॅन्डी रुग्णालय, लिलावती रुग्णालय, हिंदुजा रुग्णालया,नानावटी रुग्णालय, कोकिलाबेन धिरुभाई अंबाणी रुग्णालय, फोर्टीस, सुराणा रुग्णालयातील डॉक्टर जम्बो कोविड सेंटरमध्ये सेवा देणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण सध्या वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी पालिकेने कंबर कसली आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पालिकेने जम्बो कोविड सेंटर सुरु केली आहेत. ११ खासगी रुग्णांलयामध्ये कार्यरत असणारे ३५ तज्ज्ञ डॉक्टर आता महापालिकेच्या जम्बो कोविड केंद्रांना सेवा उपलब्ध करुन देणार आहेत. सेंटरमध्ये केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय इत्यादींचा समावेश असणार आहे. तसेच गरजेनुसार वैद्यकीय कर्मचा-यांची संख्या वाढवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या उपचार केंद्रांमध्ये १५ सप्टेंबर पर्यंत २० हजार ७२२ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
भायखळा परिसरातील ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ कंपनी येथील कोविड सेंटरमध्ये जसलोक रुग्णालयातील २ व भाटिया रुग्णालयातील ३ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे. वरळी ‘एन.एस.सी.आय’ जम्बो कोविड सेंटरमध्ये बॉम्बे रुग्णालयातील ५ व ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील ३ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे. ‘वांद्रे कुर्ला संकूल’ (बीकेसी) येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये लिलावती रुग्णालयातील ३ व हिंदुजा रुग्णालयातील ४ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे. गोरेगाव नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये नाणावटी रुग्णालयातील ४ तज्ज्ञ डॉक्टर व कोकिलाबेन धिरुभाई अंबाणी रुग्णालयातील २ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे. मुलुंड ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये फोर्टीस रुग्णालयातील डॉक्टर सेवा देणार आहेत. दहिसरमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये बॉम्बे रुग्णालयातील ५ तज्ज्ञ डॉक्टर व सुराणा रुग्णालयातील ३ डॉक्टरांकडून सेवा दिली जाणार आहे.
हेही वाचा-'पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के जागा रिक्त ठेवू'