मुंबई -इयत्ता दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला आहे. तसेच 14 जूनपासून शालेय कामकाजही सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहे. त्यामुळे शासनाने शाळेसंबंधित कामांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदकडून करण्यात आली आहे.
निकालाचे काम अत्यंत महत्त्वाचे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. इयत्ता दहावीच्या निकालाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. हा निकाल वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे 14 जूनपासून शालेय कामकाजही सुरू होत आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे आवश्यक होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड, शिक्षणाधिकारी कार्यालय यासोबत शाळेशी निगडीत अन्य कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामांसाठी जावे लागते.