मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोरोना विरोधातील "कोव्हिशिल्ड" लसीची चाचणी मुंबईत केईम आणि नायर रुग्णालयात केली जात आहे. या लसीचा अद्याप दुष्परिणाम दिसून आला नसल्याने आजपासून लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयसीएमआरच्या मान्यतेने मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोरोना विरोधातील "कोव्हिशिल्ड" लसीची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली. 26 सप्टेंबरपासून किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात लसीच्या चाचणीला सुरुवात झाली. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला. त्यानंतर, 28 सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील 3 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली.