महाराष्ट्र

maharashtra

केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण

By

Published : Nov 30, 2020, 10:56 PM IST

अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीची चाचणी महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहे. ९५ स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्याने केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला आहे. अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीची चाचणी महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहे. ९५ स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्याने केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला आहे. मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाचे २ लाख ८३ हजार ४८० रुग्ण आढळून आले आहेत. तर, १० हजार ८१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीची चाचणी केली जात आहे. या चाचणीत ही लस योग्य असल्याचे सिद्ध झाल्यास ही लस देशभरातल्या नागरिकांना दिली जाणार आहे.

केईएममध्ये दुसरा टप्पा पूर्ण

पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्डचा डोस देण्याचा दुसरा टप्पा यशस्वी पार पडला आहे. केईएम रुग्णालयात १०१ स्ययंसेवकांना कोव्हीशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार होता. परंतु, यापैकी सहा जणांनी असमर्थता दर्शवल्याने ९५ स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ९५ स्वयंसेवकांना दुसरा डोस दिल्याने केईएम रुग्णालयातील कोव्हीशिल्ड प्रक्रिया पूर्ण झाल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास त्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

नायर रुग्णालयातही दुसरा टप्पा पूर्ण होणार

नायर रुग्णालयामध्ये कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस १४५ जणांना दिला गेला. दुसरा डोस १२९ जणांना देण्यात आला असून १६ जणांना डोस देणे बाकी आहे. लवकरच त्यांनाही दुसरा डोस दिला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केईएम रुग्णालयासह नायर रुग्णालयाची निवड केली. सुरुवातीला नायर रुग्णालयात १०० स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देण्याची सूचना देण्यात आली. परंतु, आयसीएमआरच्या परवानगीने त्यांनी दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी आणखी ४५ स्वयंसेवकांची निवड केली. जवळपास १२९ निरोगी स्वयंसेवकांना क्लिनिकल चाचणीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. आता फक्त १६ स्वयंसेवक बाकी आहेत. स्वयंसेवकांना २८ दिवसानंतर क्लिनिकल चाचणीत दुसरा डोस देण्यात आला आहे. या आठवड्यात सर्व डोस पूर्ण होतील, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

हेही वाचा -मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट; 645 नवे रुग्ण, 19 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details