मुंबई : Shiv Sena MLA Disqualified Result : देशभराचं लक्ष लागलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. (दि. 20 जून 2022) रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी शिवसेनेतील आपल्या गटातील सुमारे 40 आमदार घेऊन बंड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची आणि कोण पात्र-अपात्र याचा संघर्ष सुरू होता. सुमारे वर्षभर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण चालल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांकडे आलं होतं. त्यानंतर आमदारांच्या सुनावण्या पार पडल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल दिलाय. तसंच ठाकरे गटाच्याही कोणत्याच आमदाराला अपात्र ठरवण्यात आलेलं नाही.
ठाकरे यांचं मत म्हणजे पक्षाचे मत नव्हे : शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदावरून काढण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार पक्ष चालवणं हे अयोग्य आहे. ठाकरे यांचं मत म्हणजे पक्षाचं मत नव्हे. पक्षप्रमुखापेक्षा राष्ट्रीय कार्यकारिणी मोठी आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेली प्रत ही शिवसेनेची खरी घटना आहे, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं. तसंच, 1999 साली आयोगाकडे दाखल केलेली घटना वैध आहे. दि. 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. शिवसेनेच्या घटनेत 2018 साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरले जाणार नाहीत, असंही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं.
शिंदे गट हीच खरी शिवसेना : 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं दि. 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (दि. 21 जून 2022)रोजी प्रतिस्पर्धी गट तयार झाला तेव्हा शिंदे गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष होता. असाही स्पष्ट निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिलाय.
एकनाथ शिंदेंची बंडखोरी :राज्यात (20 जून 2022)ला विधानपरिषदेची निवडणूक पार पडली. त्या दिवशी रात्रीपासून एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत 'नॉट रिचेबल' झाले. त्यानंतर हळूहळू घटनाक्रम वाढत गेला. हे सर्वजण सुरतला गेल्याचं समोर आलं. त्यानंतर 22 जूनला पहाटे 2.15 वाजता एकनाथ शिंदे आणि 30 पेक्षा जास्त आमदार सुरत एअरपोर्टवर पोहोचले. तिथून ते गुवाहाटीकडे रवाना झाले. पुढे गुवाहाटीत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं सूचित करणारं वक्तव्य शिंदे गटाकडून येऊ लागलं. मात्र, तसं झालं नाही आणि एकनाथ शिंदे भाजपासोबत जात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या हालचाली :शिवसेचे पक्षातले बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या 38 झाली. शिंदे समर्थक बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या. एकनाथ शिंदे गटाला तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनी धक्का दिला. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला झिरवळ यांनी मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरुन उचलबांगडी करत या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्त्यांना विधिमंडळाने मान्यता दिल्यामुळे शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार हे स्पष्ट झालं.
बंडखोर आमदारांना नोटीस :बंडखोर 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली. 48 तासांची मुदत देत त्यांची बाजू मांडण्याची नोटीस पाठवली. त्यानंतर आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवले जाईल असंही त्यात म्हटलं. यामध्ये 48 तासांचा अवधी देण्यात आला. दरम्यान शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणत्याही पक्षाला वा गटाला वापरता येणार नसल्यासह सहा प्रमुख ठराव मंजूर करण्यात आले.
सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात :शिंदे गटाने 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला दि. 26 जून 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर शिवसेनेची ही कृती बेकायदा असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं होतं. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास ठारावावर निर्णय होईपर्यंत त्यांना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास मनाई करावी, अशी याचिका शिंदे गटाच्या वतीने न्यायालयात दाखल केली गेली आणि पुढे बराच काळ हा विषय कोर्टात राहिला. त्यानंतर कोर्टाने सर्व बाजून सुनावण्या पूर्ण करून अंतिम निकालासाठी हा आमदार अपात्रता विषय विधानसभा अध्यक्षांकडं पाठवला. त्यावर आज विधानसभेच्या अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे असून 16 आमदारही पात्र आहेत असा निर्णय दिला.
कोणते आमदार पात्र ठरले
1. एकनाथ शिंदे
2. अब्दुल सत्तार
3. संदीपान भुमरे
4. संजय शिरसाट