मुंबई : साईबाबांच्या दर्शनासाठी केवळ राज्यभरातून नाही तर देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. तसेच, अनेकदा विदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. रोज शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र म्हणून शिर्डीची ओळख आहे. म्हणूनच शिर्डीमध्ये रात्रीही विमानाने पोहोचता यावे यासाठी विमानसेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती. भक्तांची आता ही मागणी राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला होता.
ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले : नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंधिया यांनी ही विनंती मान्य करत आता शिर्डीत रात्री विमान सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिर्डीतील नागरिकांसाठी आणि देशभरातून शिर्डीत जाणाऱ्या भाविकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. तसेच, गेल्या तीन महिन्यांत शिर्डीसाठी असे तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद : राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी समृद्धी महामार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी असा प्रवास जलद गतीने सुरू झाला आहे. तर, गेल्याच आठवड्यात मुंबईचे साईनगर शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.