मुंबई :Shiv Sena MLA Disqualification Case :हा निर्णय देताना एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या गटाला खूश करणं किंवा नाराज करणं हा हेतू माझ्यासमोर नव्हता. हा निर्णय कायदेशीर तरतुदी आणि संविधानानुसारच दिलाय. तसंच, सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिले होते त्याचे तंतोतंत पालन करून आणि न्यायालयाच्या निकषनुसारच हा निकाल दिलेला आहे. तसंच, या निकालामुळे सामान्य माणसाला संविधान, न्यायव्यवस्था यावरील विश्वास कायम राहील याचीही मी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय हा अतिशय शाश्वत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. ते निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.
दोन्ही गटांना न्याय देण्याचा प्रयत्न : पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले की, मी दोन्ही गटांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जर हा निर्णय नियमबाह्य आहे असं, जर वाटत असेल तर ठाकरे गट निर्णयाविरोधात कोर्टात जाऊ शकतो, तो त्यांना अधिकार आहे. परंतु, याचा अर्थ मी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. निर्णयात काय त्रुटी राहिल्यात हे त्यांना दाखवावे लागेल, असंही नार्वेकर म्हणालेत.
विरोधकांचे आरोप बालीश व बिनबुडाचे :ही मॅच फिक्सिंग होती, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता, त्यामुळं निकाल आधीच ठरला होता, असा प्रश्न नार्वेकरांना विचारला असता, अध्यक्षांच्या देखील काही जबाबदाऱ्या असतात. मी एक विधानसभा अध्यक्ष आहे. तसंच, मी स्वतः एक आमदार आहे. माझ्या मतदारसंघातील काही कामं असतील तर मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. असं कोणत्या कायद्यात लिहिलं आहे की, आमदार अपात्र याचिका यांची जबाबदारी पार पाडत असताना इतर मतदारसंघातील कामं करू नयेत? असा प्रश्नही नार्वेकर यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं विरोधक जे काही आरोप करत आहेत ते ते चुकीचे, बिनबुडाचे व बालिश आरोप आहेत, असंही नार्वेकर म्हणालेत.