'त्या' खासगी डॉक्टरांना दिलासा; कारवाईच्या नोटिसा अखेर महापालिकेकडून रद्द
20 डॉक्टरांना मुंबई महानगरपालिकेने परवाना रद्द करण्यासंबंधी कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या होत्या. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याचे म्हणत नोटिसा पाठवण्यात आलेल्या या डॉक्टरांना अखेर दिलासा मिळाला आहे.
मुंबई - कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोना चाचणीचा वैद्यकीय सल्ला देणाऱ्या 20 डॉक्टरांना मुंबई महानगरपालिकेने परवाना रद्द करण्यासंबंधी कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या होत्या. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याचे म्हणत नोटिसा पाठवण्यात आलेल्या या डॉक्टरांना अखेर दिलासा मिळाला आहे. या सर्व नोटिसा रद्द करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
आयसीएमआरच्या नियमानुसार आता लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी होणार आहे. अशात काही खासगी डॉक्टरांनी आपल्याकडे आलेल्या रुग्णांना कोरोना चाचणीचा सल्ला देत पालिकेकडे पाठवले. मात्र, पालिकेने मात्र लक्षणे नसलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला देणे म्हणजे आयसीएमआरच्या नियमाचे उल्लंघन असल्याचे म्हणत खासगी डॉक्टरांना नोटिसा बजावल्या. परवाना रद्द करण्यासंबंधी या नोटिसा होत्या. आयएमएने मात्र यावर कडक भूमिका घेत पालिकेच्या या कारवाईला विरोध केला.
आजूबाजूला कुणी पॉझिटिव्ह आढळल्यास पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर अनेक जण आमच्याकडे येतात. रुग्ण घाबरलेले असतात, लक्षणे नसली तरी ते निगेटिव्हच असतील असे नाही. त्यामुळे आम्ही विचार करुनच रूग्ण चाचणीसाठी पाठवतो. तेव्हा यावरून नोटीसा पाठवणे चुकीचे असल्याचे म्हणत आयएमए डॉक्टरांच्या पाठीशी उभी ठाकली. त्यानुसार डॉ. भोंडवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली होती. ही मागणी अखेर मान्य झाली असून, या नोटिसा मागे घेण्यात आल्याची माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली आहे. आता आयएमएच्या सर्व डॉक्टरांना सूचना करत लक्षणे असतील वा खूपच आवश्यक असेल तेव्हाच रुग्णांना चाचणीसाठी पाठवा असे सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने यावर नाराजी व्यक्त करत कडक भूमिका घेतली आहे. खासगी डॉक्टरांवर अशी कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला कसा? त्यांनी आधी आमच्याकडे तक्रार करावी मग पुढे आम्ही कारवाई करू, तो अधिकार आम्हाला आहे असे म्हणत पालिकेवर टीका केली आहे.