महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवनार, मालाड, महालक्ष्मी येथे पालिका प्राण्यांसाठी दहनभट्ट्या उभारणार

मुंबईत पाळीव तसेच भटक्या प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहनभट्ट्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी 17 कोटी 80 लाख 29 हजारांचा खर्च करणार आहे.

By

Published : Jan 2, 2020, 7:38 AM IST

BMC
मुंबई महापालिका

मुंबई- मुंबईत पाळीव तसेच भटक्या प्राण्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहनभट्ट्या उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पीएनजीवर आधारित असलेली या दहनभट्ट्या देवनार, मालाड व महालक्ष्मी येथे उभारण्यात येणार आहेत. पाळीव प्राण्यांसह भटके कुत्रे व मांजरांचेही येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पालिका यासाठी 17 कोटी 80 लाख 29 हजार रुपये खर्च करणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे. आता येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या धडकेने भटके कुत्रे तसेच मांजरे जखमी अथवा मृत होण्याच्या प्रमाण वाढत आहे. शिवाय उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या मृत शरीराचे दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा 1960 आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली 2001 अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी, मालाड व देवनार येथील श्वान नियंत्रण कार्यालयाच्या जागेवर पीएनजीवर आधारीत दहनभट्ट्या उभारल्या जाणार आहेत. यापैकी महालक्ष्मी श्वान नियंत्रण कक्ष कार्यालयाच्या जागेमध्ये टाटा ट्रस्टमार्फत प्राण्यांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या ट्रस्टमार्फत तेथे प्राण्यांसाठी दहनभट्टीही उभारली जाणार आहे.

हेही वाचा - मुंबई पालिकेच्या मालमत्ता करात घट; वर्षभरात १६३७ कोटी कर जमा

मालाड, देवनार भट्ट्यांसाठी लंडनमधील कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खासगी अंत्यसंस्कार स्थळ आहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावली जाते. पालिका गुरांचा कोंडवाडा असलेल्या मालाड येथे प्रत्येक ताशी 50 किलो व देवनार येथे प्रत्येक ताशी 500 किलो एवढ्या क्षमतेच्या दहनभट्ट्या बसवण्यात येणार आहेत. या दहनभट्ट्यांचा पुरवठा, उभारणी, चाचणी घेऊन बसवल्यानंतर पुढील 5 वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी लंडनमधील अनिथा टेक्सकॉट कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला 17 कोटी 80 लाख 29 हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. परवाना असलेले पाळीव कुत्रे व मांजरांवरच येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसेच जे भटके कुत्रे नोंदणीकृत असतील त्याच्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील. या दहनभट्ट्या पर्यावरणपूरक असणार आहेत. महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर दहनभट्ट्या उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

  • मुंबईतील भटके प्राणी

प्राणी गणना 2012 नुसार संपूर्ण मुंबईत 33 हजार 572 कुत्रे आहेत. तसेच सन 2014 मध्ये महापालिकेकडून केलेल्या गणनेनुसार मुंबईत 95 हजार 172 भटके कुत्रे आहेत. यापैकी सुमारे 70 हजारांहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. हे निर्बिजीकरण ‘ऍनीमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम’ अंतर्गत करण्यात आले होते. सध्या महापालिका क्षेत्रात तीनशेपेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

हेही वाचा - 'मुंबईतील निर्जन स्थळे सुरक्षित करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details