मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (कांजूरमार्ग) मेट्रो 6 मार्गातील कारशेड कांजूरमार्ग येथे बांधण्यात येत आहे. मात्र, ही जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत केंद्र सरकारने राज्य सरकारला नोटीस बजावत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)कडून सुरू असलेले माती परिक्षणाचे काम आता थांबले जाणार का? अशी चर्चा सुरू आहे. पण, प्रत्यक्षात मात्र अजून तरी काम बंद झालेले नाही. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून काम बंद करण्यासंबंधी असे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे काम बंद करण्याचा प्रश्नच येत नसल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे. त्यामुळे या ठिकामचे काम सुरुच आहे.
आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही
कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडवरून मागील सात वर्षांपासून वाद सुरू आहे. यावरून राजकारणही पेटतच आहे. आरेत कारशेड करायला पर्यावरण प्रेमी आणि शिवसेनेचा विरोध आहे. तर दुसरीकडे भाजप मात्र आरेत कारशेड करण्याची भूमिका घेत आहे. त्यांचे सरकार असताना त्यांनी ही भूमिका ठाम ठेवत आरेत कारशेडचे काम सुरू केले, ते आतापर्यंत सुरू होते. पण, आता मात्र शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेड रद्द केले आहे. तर हे कारशेड कांजूर मार्ग येथील एका जमिनीवर हलवले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भाजपचे अनेक नेते संतापले असून त्यांनी विविध आरोप केले आहेत. एकूणच भाजप-शिवसेना संघर्ष सुरू झाला. पण, आता यात केंद्राने उडी घेतली आहे. ही जागा आपली असल्याचे म्हणत केंद्राने मेट्रो कारशेडचे काम त्वरित बंद करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या नोटिशीनंतर काम बंद होणार का, असा प्रश्न होता. त्यानुसार एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी आमच्याकडे अद्याप कोणतीही नोटीस किंवा तसे आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही जागा जिल्हाधिकाऱ्यांकडूनच मिळाली
मेट्रो 6 च्या कारशेडसाठी ही जागा आम्हाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे आदेश आले तरच काम बंद होऊ शकते. आतापर्यंत आम्हाला असे कोणतेही आदेश आलेले नाहीत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.