महाराष्ट्र

maharashtra

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला सशर्त जामिन

By

Published : Jul 15, 2021, 8:52 PM IST

अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. विक्रम भावेच्या वडिलांचे रत्नागिरीत कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

उच्च न्यायालय
उच्च न्यायालय

मुंबई- अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सशर्त जामीनातून त्याला दिलासा देण्यात आला आहे. ‌ विक्रम भावेच्या वडिलांचे रत्नागिरीत कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट, 2013 रोजी झाली. आरोपी शरद कळसकरने सीबीआयला दिलेल्या जबाबानंतर याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहायक विक्रम भावेला मे, 2019 मध्ये अटक केली होती.

2013 मध्ये पुण्यात डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेनेच मदत केली होती, असा आरोप तपासयंत्रणेने ठेवला आहे.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठाने भावेला एक लाख रुपयांचा व्यक्तिगत जामीन मंजूर केला होता. तसेच कठोर निर्बंध देखील लादले होते. जामीनानंतर प्रत्येक दिवशी तपास यंत्रणेने समोर हजर राहण्याच्या सूचना भावेला न्यायालयाकडून देण्यात आल्या होत्या. एक महिना दररोज तपास यंत्रणेसमोर हजेरी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. एका महिन्यानंतर एक दिवस आड हजेरी लावण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या होत्या. तसेच या संपूर्ण कालावधीत पुणे परिसराबाहेर न जाण्याच्या आणि साक्षी पुरावे प्रभावित न करण्याच्या सूचनाही भावेला न्यायालयाने दिलेल्या होता. यापैकी ही अट मोडली तर भावेचा जामीन रद्द होईल, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी विक्रम भावेने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागत अर्ज दाखल केला होता जो न्यायालयाने स्वीकारला आहे.

हेही वाचा -शरद पवारांच्या अंगणात नाना पटोले घेणार ओबीसी मेळावा

ABOUT THE AUTHOR

...view details