मुंबई - भांडूप ड्रिम्स मॉलमध्ये आग लागल्याने याच मॉलमधील सनराईज हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही आग मॉलमधील बँक्वेट हॉलमधील सिलिंडरच्या बेकायदेशीर साठ्यामुळे भडकल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून या प्रकरणी ड्रिम्स मॉल, सनराईज हॉस्पिटल व बॅन्क्वेट हॉल व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे.
मॉलमधील सावळा गोंधळ आला समोर -
भांडूप येथील ड्रिम्स मॉलमध्ये २५ मार्चला भीषण आग लागली होती. या आगीची झळ तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनसाईज कोविड सेंटरला बसली आणि या दुर्घटनेत ११ कोरोना बाधित रुग्णांना जीव गमवावा लागला होता. या घटनेची चौकशी मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली. त्यात भांडूप येथील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीत व्हेंटीलेशन अभावी धुर बाहेर जाऊ न शकल्याने हा धुर तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहचला. तसेच आगीच्या वेळी इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणाही बंद होती. मॉलमधील सावळा गोंधळ या अहवालातून समोर आला आहे. या संपूर्ण इमारतीचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करावे. तसेच या इमारतीला महानगरपालिकेने दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.