मुंबई - बायोमेट्रिक हजेरीमुळे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बायोमेट्रिकमुळे कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुखांचे पगार थांबवले जातील असे आश्वासन आयुक्त प्रवीण परदेशी दिले आहेत. अशी माहिती कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने दिली आहे.
अयोग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांचा पगार कापल्यास अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार - biometrics in BMC
बायोमेट्रिक हजेरीमुळे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार कापले जाण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद करण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी पद्धत सुरू करण्यात आली. बायोमेट्रीकला आधारकार्ड नंबर जोडण्यात आला. मात्र, यंत्रणेतील त्रूटींचा कर्मचाऱ्यांना फटका बसतो आहे. अनेकदा मशीन बंद असतात. सदोष नेटवर्कचीही त्यात भर पडते. अतिरिक्त कामांकरिता थांबल्यानंतरही हजेरीची नोंद होत नाही. उपस्थित राहूनही कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती लागते. बायोमेट्रीकमधील वाढत्या समस्यांमुळे ७० हजार कामगार कर्मचाऱ्यांचे वेतन कापले. महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या शिष्ठमंडळाने या संदर्भात महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची मंगळवारी भेट घेतली.
चुकीच्या पध्दतीने कापलेले वेतन १० जून २०१९ पर्यंत कामगारांच्या बँक खात्यात जमा करावे, असे आदेश उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुनील धामणे यांनी दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे चुकीच्या पद्धतीने वेतन कापल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुखांचे वेतन रोखण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. राज्य सरकारच्या विमा योजनेप्रमाणे गट विमा योजना लागू करावी. १ ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंतचे कर्मचाऱ्याचे वैद्यकीय दावे निकाली काढण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. या बैठकीला समन्वय समितीचे बाबा कदम, महाबळ शेट्टी, सुखदेव काशिद, दिवाकर दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.