मुंबई - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीच्या टप्प्यात वाहतुकीची झालेली अडचण, त्यानंतर रद्द झालेल्या यात्रा-जत्रा व इतर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायाचे आर्थिक समीकरण पूर्णतः विस्कटले असून ते पुन्हा सुरळीत होण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा दूध उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त संकलित केलेल्या दुधाची दूध पावडर तयार केली गेली आहे. या कृषी आधारित व्यवसायाला अगोदरच अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. अनेक दुध डेअरी संस्था या मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ बवतात त्यामध्ये, दही, श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड, लोणी, खवा, पेढा, ताक, लस्सी, बटर, मलईचे पदार्थ, सुगंधी दूध, मठ्ठा, तूप आणि इतर पदार्थाचा समावेश होतो. या व्यतिरिक्त दुधाचा वापर हा विविध घटकांमध्येही केला जातो जसे की, ज्यूस, बेकरी उत्पादने, चहा. देशातील यात्रा व इतर महोत्सवामध्ये या पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. २५मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आणि त्या अनुषंगाने सर्व यात्रा व महोत्सव रद्द झाले. फेब्रुवारी ते मे महिन्यात आईस्क्रीम, ज्यूस, ताक, सुगंधी दूध व इतर पदार्थांना मोठी मागणी असते. त्यानंतर जून,जुलै,ऑगस्ट हे सणासुदीचे दिवस असतात. या दिवसांमध्येही दुधापासून बनवलेल्या मिठाईजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती अहमदनगर कल्याणकारी दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
लॉकडाऊनमध्ये पुरेशा प्रमाणात दुधाची विक्री झाली नाही. दूध विक्रीतून येणारा पैसा हा जनावरांचा चारापाणी आणि मजुरीसाठी खर्च करावा लागत आहे. अनलॉक केल्यानंतरही अजून दूध व्यवसायातील अडचणी दूर झालेल्या नाहीत, असे डेरे यांनी सांगितले.
दूध उद्योगासमोर सध्या 'कोरोना'मुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. जागतिक बाजारात 370 रुपये प्रति किलोपर्यंत असलेले दूध पावडरचे दर आता 155 रुपयांपर्यंत घसरले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी हे दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांपासून हा व्यवसाय अडचणीत आला आहे. आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केला असले तरी दुग्धव्यवसाय आणि त्याच्या जोडधंद्यांना अद्याप त्याचा तसा फायदा झालेला नाही. मिठाईची दुकाने, हॉटेल सर्व काही बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा चाराही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने अडचणीत अधिक वाढ झाली आहे, असे दूध उत्पादक शेतकरी पंढरीनाथ मानकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
दररोज होणाऱ्या दूध विक्रीतून दोन पैसे हाती येतात यावरच या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु लॉकडाऊन काळात फक्त घरगुती वापरासाठी लागणाऱ्या दुधाची विक्री सुरू आहे. त्यात दूध हे नाशवंत असल्याने जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे काही ग्राहकांना स्वस्त दरातच ही दूध विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हा धंदा तोट्यात आला आहे. भरीसभर म्हणजे मध्यंतरी अवकाळी पावसामुळे संपूर्ण चारा पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. त्यावेळी 2 रुपये किलोने मिळणारा चारा आता 16 रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. यामुळे सर्व आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. चाराही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून या जनावरांनाही विकून टाकावे लागत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार यांनी सांगितले.
राज्यात दररोज सरासरी 2 कोटी 10 लाख लिटर दुधाचे संकलन होत असते. 'कोरोना'मुळे जागतिक बाजारात 370 रुपये प्रति किलोपर्यंत असलेले दूध पावडरचे दर आता थेट 155 रुपयांपर्यंत घसरले आहेत. पावडरचे दर कोसळल्याने राज्यातील दूध उद्योग अडचणीत आला आहे. सध्या राज्यात 10 हजार टन पावडर शिल्लक आहे. तसेच पिशव्यांद्वारे होणाऱ्या दुधाचीही विक्री घटली आहे. 32 रुपये प्रतिलिटरवर गेलेले दुधाचे दर आता 18-19 रुपयांवर पोहोचले होते.
1 मे 2018च्या दूध दर आंदोलनानंतर सरकारने दूध पावडरसाठी प्रती किलो 50 रुपयांचे अनुदान दिले. त्यानंतर प्रकल्पांनी दूध उत्पादकांकडील दुधाला 25 रुपये प्रति लिटरपर्यंत दर दिला. त्यानंतर जागतिक पातळीवर दूध पावडरचे दर 260 रुपये प्रति किलोवरून 330 ते 350 रुपयांपर्यंत गेल्याने राज्यातील दूध प्रकल्पांनी स्वत:हून दूध खरेदीचे दर वाढवले. त्यात अनेक प्रकल्पामध्ये स्पर्धाही झाली. त्यातून दूध खरेदीचा दर 32 रुपये प्रति लिटरपर्यंत गेला. त्यामुळे दूध उत्पादकांनी ज्यादा गायी खरेदी केल्या. याचा परिणाम म्हणजे 2019 मध्ये उन्हाळ्याच्या काळात जेथे 1 कोटी 60 लाख लिटरपर्यंत दूध संकलन होत होते तेच आता 1कोटी 80 लाख लिटरपर्यंत वाढले आहे.