मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या शेकडो उत्तरपत्रिका टाळेबंदीमुळे विविध ठिकाणच्या पोस्ट कार्यालयात आणि शाळांमध्ये अडकून पडल्या आहेत. तब्बल 55 टक्क्यांहून अधिक उत्तरपत्रिका या अशा प्रकारे अडकल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे बारावीच्या उत्तरपत्रिका या सर्वच तपासून पूर्ण झाल्या असून त्यातील सुमारे 10 टक्क्यांहून अधिक उत्तरपत्रिका शाळांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्या गोळा करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दहावीच्या उत्तरपत्रिका सर्वात जास्त या मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पोस्टात तसेच शाळांमध्ये अडकून पडल्या आहेत. मात्र, निकाल लवकर लागावा यासाठी त्या उत्तरपत्रिका तातडीने परीक्षक आणि नियामक यांच्याकडे तपासणीसाठी द्याव्यात, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाने दिल्या केल्या असल्याचे सांगण्यात येते.
टाळेबंदीमुळे दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द झाला होता. इतर अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका शाळांमध्ये पोहोचण्याच्या मार्गात असताना त्या पोस्टातच अडकून पडल्या आहेत. तर काही शाळांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी शाळांमध्ये त्या शाळा बंद असल्याने स्वीकारल्या गेल्या नाहीत, अशी माहितीही समोर आली आहे.
जवळच्या शाळांमध्ये जमा करण्याची सुविधा
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका या वेळेत मिळाव्यात म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील जवळच्या शाळांमध्ये जमा करण्याची सोय केली आहे. त्यासाठी मंडळाने मागील काही दिवसांमध्ये या शाळांची यादीच प्रत्येक शाळा आणि शिक्षकांना पाठवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिका जमा करता येत असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
शाळा, मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे
मुंबई आणि परिसरातील ज्या शाळातील शिक्षकांना दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील ज्या पोस्टात पडून आहेत, किंवा मंडळात पुन्हा आल्या आहेत, त्या शाळा आणि मुख्याध्यापकांनी संबंधित पोस्ट कार्यालयात जाऊन त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात. जर उत्तरपत्रिका मंडळात असतील तर तशी माहिती द्यावी मंडळाकडून त्या पुन्हा पाठविण्याची सोय केली जाईल, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेऊ - उदय सामंत