मुंबई :राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणी दरम्यान अनेक बाबी समोर येत असून, मुख्यत्वे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी दिलेले निर्देश आणि बजावलेल्या नोटिसा यावर खल सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित असून त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय हे योग्य ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवड योग्य कशी? :या संदर्भात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी झालेली निवड ही बहुमताने झाली असल्याचे आपल्याला मान्य आहे. जर माझ्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दिला गेल्याने मी घेतलेले निर्णय अथवा दिलेले आदेश अयोग्य असतील तर माझ्याच देखरेखी खाली आणि अध्यक्षतेखाली झालेली विधानसभा अध्यक्षांची निवड तरी योग्य कशी? आणि जर ती निवड योग्य ठरत असेल तर मी घेतलेले अन्य निर्णय अयोग्य कसे? असा सवाल झीरवाळ यांनी उपस्थित केला आहे.
आमदारांच्या अपात्रतेची नोटीस अयोग्यच? : सोळा आमदारांना दिलेली अपात्रतेची नोटीस अयोग्य आहे, कारण तत्पूर्वीच 34 आमदारांनी आपल्या विरोधात अविश्वासाची नोटीस दिली होती. या संदर्भात विचारले असता झिरवाळ म्हणाले की, माझ्या विरोधात अविश्वासाची दिलेली नोटीस ही एका वैयक्तिक आणि अनधिकृत मेलवरून आली होती. त्यानंतर 22 जून रोजी पुन्हा एकदा मेल आला आणि तो मेल विधानभवनात नोंद आहे. मात्र, माझ्या विरोधात केवळ अविश्वासाची नोटीस बजावली होती. मला अपात्र ठरवण्यात आलेले नव्हते. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधिमंडळाचे सर्व निर्णय घेण्याचा मला अधिकार होता आणि त्या निर्णयानुसारच मी तत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेतलेला आहे असा दावा झिरवाळ यांनी केला आहे.