मुंबई :भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार गाय आणि गोमांस याबाबत कायमच दक्ष असतो. विशेषता गोमांस भक्षणाबाबत ही मंडळी अटी तटीवरच असते. मी गोमांस खातो किंवा गोमांस खाण्यास गैर काय? असे कोणी बोलल्यास ही मंडळी त्याच्यावर तुटून पडतात. मात्र आता भाजपचे मेघालय प्रदेशाध्यक्ष एरनेस्ट मावरी माऊली यांनीच आपल्याच पक्षाची पंचायत केली आहे. मावरी यांनी उघडपणे आपण गोमांस खातो, ती आमची संस्कृती आहे आणि माझ्या पक्षाला यावर कोणताही आक्षेप नाही असे म्हटले आहे. यावर भाजप आणि परिवारातील मंडळींचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न उपस्थित करून हा भाजपचा आणि परिवाराचा दुटप्पीपणा असल्याची सामनामधून टीका करण्यात आली आहे.
भाजपाचा रंग गरजेनुसार बदलतो :भाजपाचा रंग त्यांच्या राजकीय गरजेनुसार बदलत असतो. इतरांनी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर यांचा तीळपापड होतो. पण स्वतः काही करतात तेव्हा त्याला राष्ट्रीय गरज वगैरे तात्विक मुलामा दिला जातो. मेहबूबा मुक्ती सारख्या फुटीरतावादी आणि हिंदुत्वाच्या उघड विरोधक असलेल्या बाईच्या पक्षासोबत जम्मू-काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यात भाजप सत्तेत बसू शकतो. तेव्हाही त्यांचे हिंदुत्व संकटात येत नसते. भाजपाची भूमिका हिंदुत्वाबाबत, गोमांसबाबत सारखी असल्याचे सामानात म्हटले आहे. सामनातून भाजपवर निशाणा साधला गेला आहे. भाजपचे हिंदुत्ववादी धोरण, गायप्रेम खोटे हे ढोंगी असल्याचे म्हटले आहे.