मुंबई :केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपने चिंतन करायला हवे. अमित शहा यांचे फक्त निवडणुकांवर लक्ष आहे. जनतेचा शाहांपेक्षा ठाकरेंवर जास्त विश्वास आहे. त्यांच्याबरोबर कोण राहिले आहे? शिवसेना व अकाली दल त्यांना सोडून गेले आहे. सोबत कोण आहे, हे त्यांना २०२४ नंतर त्यांना समजेल. भाजपने निर्माण केलेल्या चक्रव्यूहात तेच अडकले आहेत.
महाराष्ट्रात येऊन इथे ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याऐवजी मणिपूरमध्ये काय सुरू, याकडे शाह यांनी लक्ष घालावे. शाह इतके मोठे गुजरातचे लोहपुरुष आहेत. मग मणिपूरमध्ये अजून हिंसा थांबली का नाही? महाराष्ट्रासहित काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत, त्याला कोण जबाबदार आहे? अमित शाह यांनीकायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आहे.काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या का होत आहेत? त्याला कोण जबाबदार आहे. असा प्रश्नांचा भडिमार संजय राऊत यांनी केला आहे.
बेईमान हे मुख्यमंत्री पदावर बसले:अमित शाह यांनी चार प्रश्न विचारले आहेत. त्याचे चिंतन स्वतः भारतीय जनता पक्षाने करायला हवे. मुस्लिम आरक्षणबद्दल आमची भूमिका हीच आहे की, जाती धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण भेटता कामा नये. आम्ही ट्रिपल तलाकला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्राच्या हिताचे असले तर शिवसेना नेहमीच पुढे राहिली आहे. आज बेईमान हे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. मात्र, अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही. मग आता अशी कुठली गोष्ट झाली? असा प्रश्न विचारत भाजपनेच धोका दिल्याचे सूचित केले.
ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार :नांदेडमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. जंगलातील कितीही जनावरे आले तरी वाघाची शिकार होऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कीशिवसेना खरा वाघ आहे. शिवसेनेचे बोधचिन्हच वाघ आहे. जे वाघाचे खोटे कातडे घालून शिकार करायला येतात, खरा वाघ आल्यावर कातडे काढून पळतात, तेव्हा त्यांचीच शिकार होते, असेही राऊत म्हणाले आहेत. धोका कोणी दिला व कोणाला दिला याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. धोका कोणी दिला आहे हे ते स्वतःच कबूल करत आहेत. शिवसेनेमध्ये ज्या काही नियुक्त्या होतात त्याबाबत इतर पक्षाने बोलू नये. शिवसेनेतून फुटलेल्या गटाला आता भाजपने मांडीवर बसवले आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्याचा आम्हाला आनंद :राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात काही बदल केले आहेत. या बदलाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र पार्टी आहे. शरद पवार यांनी पक्षाची काही नव्याने रचना केली. प्रत्येक पक्ष अशा पद्धतीच्या रचना करत असतो. तशी त्यांनी केली, तर तो त्याच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याला तुम्ही भाकरी फिरवली, करपली काहीही म्हणा अशा पद्धतीचे बदल सर्वच पक्षांमध्ये होत असतात. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांनी काही पक्षा संदर्भात निर्णय घेतले असतील तर ते नक्कीच भविष्याचा वेध घेऊन, अनुभवातून निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाचे परिणाम भविष्यात समोर दिसतील. सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष झाल्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. अजित पवार यांचे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे स्थान आहे व ते स्थान कायम आहे.
हेही वाचा-
- Amit Shah Vs Uddhav Thackeray : प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा होईल पर्दाफाश, अमित शाह यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
- Amit Shah Rally In Nanded : महाराष्ट्राला नंबर एक बनवण्यात देवेंद्र फडणवीसांचे मोठे योगदान, तर पंतप्रधान मोदींनी . . . अमित शाहांनी उधळली स्तुतीसुमन