मुंबई- 'ठाकरे' ब्रॅण्ड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे आणि दुसरा ब्रॅण्ड 'पवार' नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डना नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा, असे कारस्थान सध्या सुरू असून ते उघडे पडले आहे. त्यामुळे मराठी माणसाने एक होणे गरजेचे असल्याचे असे सांगत शिवसेनेने मनसेला साद घातली आहे.
राज ठाकरे हे सुद्धा 'ठाकरे' ब्रॅण्डचे एक घटक आहेत आणि या सगळ्या वादाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेसोबत मनसेचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्यादिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, यामुळे मुंबई, महाराष्ट्रासाठी 'ठाकरे' ब्रॅण्ड टिकला पाहिजे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. पक्षाचे मुखपत्र 'सामना'तून रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे.
मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असून हे ग्रहण 'उपरे' लावत आहेत, पण दुर्दैवाने त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले असल्याची टीका सेनेने विरोधकांवर केली आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. यामुळेच मुंबईची सतत बदनामी केलीे जात असून त्या कारस्थानाचा एक तो भाग आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणवणारी एक नटी आणि मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एका वृत्तवाहिनीचे संपादक यांच्या मागे कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे, असा हा कठीण काळ आला आहे, असेही आवाहन केले आहे.
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज'रोखठोक' सदरात या 'मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!' नावाने लेख लिहून मुंबई महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषा बोलते, आव्हानाची भाषा करते, त्यावर महाराष्ट्रातील जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईवर पहिला हक्क महाराष्ट्राचा -
ज्या सिनेसृष्टीतील कलावंतांनी मुंबईच्या अवमानासंदर्भात समोर येऊन बोलायला हवे होते आणि मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. परंतु ते सगळेच खाली मान घालून बसतात. त्यामुळे मुंबईचे महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठी आहे. पण या सगळ्यांनी एकच लक्षात घेतले पाहिजे. 'ठाकरे' यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत, त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवती फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर, जगाची. पण जिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा-जेव्हा मुंबईला डिवचले जाईल, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला, असे सांगत शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे.