महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय; म्हणाले...

कोरोना विषाणुचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मुर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाय योजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावे. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jun 20, 2020, 10:44 PM IST

मुंबई - कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यामध्ये आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भुमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबीरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणुचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मुर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाय योजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावे. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेश उत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करू या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

चर्चेत सहभागी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनीही आरोग्य शिबारे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसेच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी उपक्रमांचे नियोजन करू. मुर्तींच्या उंचीबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचे पालन केले जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी भुमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मुर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details