मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसची आज 11 वाजता बैठक आहे. गेली काही दिवस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार गेले दोन दिवस कार्यकर्त्यांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांना जाणून घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा आपण आदर करतो. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही, कारण तसे केले असते तर कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊ दिला नसता, असेही पवार यांनी स्पष्ट करत आपली भूमिका मांडली.
पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत? :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे अध्यक्ष पदावरून पाय उतार झाले असले तरी, आता ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव सल्लागार म्हणूनही शरद पवार आपली जबाबदारी पार पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यक्षपदावर कार्यरत नसले तरी मुख्य मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून ते पक्षाच्या केंद्रस्थानी कायम असतील. तशा पद्धतीचे संकेतच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगून पवार यांनी आपण केंद्रस्थानी कायम असणार असल्याचे जणू स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अध्यक्षपदी सुप्रिया की भुजबळ ? :राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय अध्यक्षपदी आता सुप्रिया सुळे यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे या गेल्या पंधरा वर्षापासून केंद्रीय स्तरावर खासदार म्हणून काम करत आहेत. केंद्रीय स्तरावर असलेला त्यांचा संपर्क, केंद्रीय राजकारणाची समज पाहता सुप्रिया सुळे यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. त्याचा फायदा केंद्रीय स्तरावर होऊ शकतो. अशी एक चर्चा सुरू असली तरी छगन भुजबळ यांचे वाढते वय, त्यांच्यावर मधल्या काळात झालेले आरोप पाहता त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळण्याची शक्यता आहे.