मुंबई : राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने (Nawab Malik Bail Granted) त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे. नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी नवाब मलिक यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात जामीनाची (Nawab Malik Money Laundering Case) मागणी केली होती. त्यावेळी ईडीने जोरदार विरोध केला होता. मात्र, शुक्रवारी (11 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे.
दोन महिन्यांसाठी जामीन -मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय आधारावर जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगातच होते. आता ते दोन महिन्यांसाठी तुरुंगाबाहेर येणार आहेत.
जामीनासाठी वेळोवेळी अर्ज - नवाब मलिक यांनी अनेकवेळा मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळीही मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन नाकारला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालायाने नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.