मुंबई : Sunil Tatkare On Raj Thackeray :कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा संदर्भ न देता लोकांमध्ये वेगळे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे असा हल्लाबोल राकॉं नेते सुनील तटकरे यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत केला. अलीकडे काहींच्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार साहेबांचा उल्लेख न्यायालयात एकेरी पध्दतीने झाला असे अश्रूला वाट देत मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न काहींनी केला, असा टोलाही त्यांनी नाव न घेता आव्हाड यांना लगावला. या युक्तिवादाची माहिती घेतली त्यामध्ये जो उल्लेख एका 'पॅरा'मध्ये करण्यात आला आहे त्याचा संदर्भ पूर्वीचा आहे. तो संदर्भच वाचण्यात आला. आधीच्या याचिकेतील जो निर्णय दिला गेला होता त्यातील 'पॅरा' वाचण्यात आला. अनेक वेळा पाहतो की इंग्रजीमध्ये उल्लेख करताना 'he said so' , 'he did so' असे म्हणत असतो. मराठीत आदरातिथ्य म्हणून 'ते' म्हणत असतो. तर एकेरी शब्दाचा उल्लेख कधी उच्चारला जातो. इंग्रजीत 'he' हा एकच शब्द आहे. त्यामुळे तिथे होणारा युक्तीवाद हा मराठीत नाही असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा:राकॉं पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असून युक्तिवाद सुरू आहे. आमच्या याचिकेत जे मुद्दे उपस्थित केले होते त्यासंदर्भातील आमची भूमिका कायदेशीर कसोटीवर कशी योग्य आहे हे त्याठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा युक्तिवाद हा कायद्याच्या कसोटीवर आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य कसा आहे ती बाजू मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध तटकरे यांनी केला. सरकारने गृहविभागाची यंत्रणा लावून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.