महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ई टीव्ही भारत विशेष : वर्षभरात २५ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कारण काय? - ST employees suicide

गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न मिळत असल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत महामंडळातील २५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

st
एसटी फाईल फोटो

By

Published : Oct 17, 2021, 1:59 AM IST

Updated : Oct 17, 2021, 3:22 AM IST

मुंबई - पूर असो की नैसर्गिक आपत्ती, कोरोनाची महामारी की, निवडणुकीची धामधूम, यामध्ये एसटी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न मिळत असल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत महामंडळातील २५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, या आत्महत्येमागचे नेमकं कारण काय? याला जबाबदार कोण? याबाबत 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • १९ महिन्यात २५ एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या -

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असे एसटीला संबोधले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एसटीमध्ये उत्पन्नपेक्षा सेवेसाठी खर्च जास्त होत आहे. तसेच दिवसेंदिवस एसटी महामंडळाचा तोटा वाढत जात असल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच गेल्या वर्षापासून कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाहीत. परिणामी गेल्‍या दीड वर्षात बहुतांश वेळा वेतनास विलंब होत असल्‍याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी पडत आहेत. त्यातच घराचे हप्ते, मुलांचा शिक्षणाचा खर्च, किराणा खर्च आदी विविध खर्च भागवणे कर्मचाऱ्याला खूप अवघड जात आहे. एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सततच्या मानसिक दबावातूनच ते आत्म्हत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२० ते मे ऑक्टोबर २०२१ पर्यत राज्यात २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

हेही वाचा -ST महामंडळाचे शासनात विलीनीकरण होणार? शरद पवारांसोबत कामगार नेत्यांची झाली बैठक

  • आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव -

कृष्णा बळीराम पुरी (कोल्हापूर), विशाल गुलाब हटवार (नागपूर), अमोल धोंडीराम माळी (इस्लामपूर), वसंत देवराव जाधव (वसमत आगार), अशोक ताडकुळे (नाशिक आगार), मोहनसिंग मानसिंग पाटील (जामनेर आगार), पांडुरंग संभाजी गडदे (रत्नागिरी आगार), मनोज अनिल चौधरी (जळगाव आगार), शरद दत्तात्रय जाधव (निलंगा आगार), धनंजय दिपक नामे (देवरुख आगार), संजय संभाजी जानकर (माहूर आगार), गोविंद भिमराव मंगनाळे (कंधार आगार), भास्कर आनंदराव वंजारी (पांढरकवडा आगार), संजय दगडू शिवदे (म्हाडा आगार), केंद्रे ताई आगार (अहमदपूर आगार), प्रकाश गि. पावरा (शहादा आगार), कमलाकर भिकन बेडसे (साक्री आगार), सुभाष शिवलिंग तेलारे (पाथर्डी आगार), प्रकाश दिगंबर भुरके (सोलापूर आगार), हर्षद वामन राव (वरोरा आगार), शत्रुघन मंगर कंगाले (साकोली आगार), दिपक विठ्ठल घाडगे (रत्नागिरी आगार), संजयकुमार रामराव केसगीरी (उदगीर आगार).

  • आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे अश्रू कसे पुसणार- बरगे

वाढत्या महागाईच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी पडत आहेत. याशिवाय गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील ९६ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही. यामुळेसुद्धा एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सततच्या मानसिक दबावातूनच ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या वर्षांपासून एसटी महामंडळातील २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याला जबाबदार स्वतः एसटी महामंडळ असून महामंडळातील लेखा विभागाला आर्थिक गणित जुळवता आले नाही. यामुळेच आज एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

  • महामंडळाचे विलीनीकरण आवश्यक -

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. वेतनातील हा फरक जवळपास ५ ते ७ हजार रुपयांचा आहे. कायद्याने वेतनवाढीस मान्यता दिलेल्या या तरतुदीची अद्याप अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार नाही. एसटी महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नावर या पुढे आर्थिक गणित जुळणे मुश्कील आहे. विशेष म्हणजे डिझेल दरवाढ झाल्याने अजून आर्थिक गणित कोलमडून जात आहे. एसटीची आर्थिक स्थिती इतक्यात सुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ होणार नाही.

  • महामंडळाला अपयश -

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. आता कोरोनाच्या संसर्गामुळे एसटीचे चाक थांबून आहेत. त्यामुळे प्रवासी महसूलात लक्षणीय घट आली आहे. परिणामी भविष्यात एसटीचा गाडा हाकणे महामंडळाला जड होणार आहे. एसटी महामंडळाचा सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. या खर्चाची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मजुरी दिली आहे. मात्र, या योजनेला प्रतिसाद मिळत नाही. सध्या एसटी महामंडळात एकूण एक लाख ३ हजार कर्मचाऱ्यांपैकी २७ हजार ज्येष्ठ कर्मचारी आहेत. त्यामुळे एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातसुद्धा एसटी महामंडळाला अपयश आले आहे.

हेही वाचा -सरकार अजून किती आत्महत्येची वाट बघणार? एस टी कामगार संघटना आक्रमक

Last Updated : Oct 17, 2021, 3:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details