मुंबई- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. अजूनही आघाडीचे काही नेते युतीमध्ये येण्यासाठी रांगेत असल्याचे युतीचे नेते सांगत आहेत. तर आमच्यातले आऊट गोईंग बंद झाले असून आता इन कमिंगला सुरुवात झाली असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या पक्षांतराच्या आणि आयाराम गयारामांच्या घडामोडी उमेदवारी जाहीर होऊन फॉर्म बी मिळेपर्यंत चालूच राहणार आहेत. मात्र, या घडामोडींवर एक नजर टाकली असता, काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांनीच पक्षांतर केले आहे. पंरतु हे नेते असे आहेत की यातील काहींना उमेदवारी हवी आहे, तर काहींना फक्त चौकशींचा ससेमिरा टाळायचा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. (इडी, सीबीआय, शिखर बँक,) त्यामध्ये प्रामुख्याने ऊस पट्टा समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांचांच भरणा अधिक आहे.
हेही वाचा -२० तास काम करणार, पण राज्य चुकीच्या हातांत जाऊ देणार नाही - पवार
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आखलेल्या व्युह रचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या मेगा भरतीत अनेक साखर सम्राट भाजपच्या गळाला लागले आहेत. तर याचाच फायदा घेत सेनेनेही आयारामांसाठी मातोश्रीचे दारे उघडी करत अनेकांना शिवबंधनातल अडकवले. या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेशकर्ते झालेले सर्व नेते हे साखर सम्राट आहेत किंवा साखर कारखाना, जिल्हा सहकारी बँका, बाजार समितीचे संचालक म्हणून तरी कार्यरत आहेत. त्या दृ्ष्टीनेचे कोणकोणत्या साखर सम्राटांनी बदलती परिस्थिती पाहून भाजप सेनेत प्रवेश केला आहे, याबाबतचा हा एक आढावा..
हेही वाचा - हवशे-गवशांचा महापूर..! सिध्दू'अण्णा विरुध्द सचिन'दादा' काँटे की टक्कर?
विखे पाटील-
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे मानले जाणाऱ्या विखे पाटील घराण्याने राज्यातील पहिला सहकारी साखर सुरू केला. त्यामुळे विखे पाटील घराण्याला राज्यातील पहिले साखर सम्राटाचे घराणे म्हणले तर वावगे ठरणार नाही. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर काऱखान्यांच्या माध्यमातून त्यांनी सहकाराची बिजे रुजवली. राजकारणातही एक स्वतंत्र जागा निर्माण केली. मात्र सुरुवातीपासूनच पक्षांतराचा इतिहास असणाऱ्या या घराण्याच्या तिसऱ्या पिढीनेही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे विरोधी पक्ष नेतेपदी असतानाही राधाकृष्ण विखेंचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पराभव केला. सुजय विखें पाठोपाठ राधाकृष्ण विखेंनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. शिवाय मंत्री पदही पदरात पाडून घेतले. आघाडीतून युतीत जाणारा विखे हे साखर सम्राटच आहेत.
मधुकर पिचड - अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.या पितापुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती साखर काऱखाना पिचड यांच्या मालकीचा आहे. साखर सम्राटांच्या यादीत या दोघांचाही समावेश होतो.
हेही वाचा- MAHA VIDHAN SABHA : स्वतंत्र महाराष्ट्राची पहिली निवडणूक.. तीन मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उदय
रणजितसिंह मोहिते पाटील -
अकलूजचे मोहिते पाटील हे राजकारणी घराणे असून साखर सम्राट म्हणून त्यांची ओळखळ आहे. मात्र, या साखर सम्राटांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आयुष्यभर ज्या विचारसरणीच्या विरोधात लढा दिला त्याच पक्षात म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटलांना तिकीट मिळणार नाही, या शक्यतेतून मोहिते पाटलांनी पक्षांतर केले. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मोहिते पाटील यांचा शंकर सहकारी साखर काऱखाना, शिवरत्न उद्योग समूहाच्या करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर हे कारखाने आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 'विजय शुगर'ने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून घेतलेले १७६ कोटी रुपयांचे कर्ज व व्याज थकविल्याप्रकरणी विजय शुगरचा ताबा जिल्हा बॅँकेला देण्यात आला होता.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील -
इंदापुरातील काँग्रेस नेते आणि साखर सम्राट हर्षवर्धन पाटलांनीही अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटलांचेही २ साखर कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात इंद्रेश्वर व इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी कारखाने हर्षवर्धन पाटलांचे आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या हर्षवर्धन पाटलांनी यापुढे पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर टाकेल, ती मी प्रामाणिकपणानं निभावेल," असं म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळीही राष्ट्रवादीचे दत्ता भऱणे आणि हर्षवर्धन पाटील यांची काटे की टक्कर या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - विखे पाटलांचे जावई माने-देशमुख विधानसभेसाठी 'या' मतदारसंघातून इच्छूक
माजी खासदार धंनजय उर्फ मुन्ना महाडिक -
कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीच्या माध्यमातून सहकाराचे आणि उद्योगाचे जाळे निर्माण करणारे धनंजय महाडिक यांना देखील साखर सम्राट म्हणूनच ओळखले जाते. त्यांचा कोल्हापुरात राजाराम सहकारी तर सोलापुरात भिमा सहकारी साखर कारखाना आहे. मुन्ना महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र पक्षविरोधी कारवाया आणि कोल्हापुराच्या राजकारणातील कुरबुरीमुळे कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत यंदा त्यांना पराभवाच्या गर्तेत ढकलले. मात्र समोर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि अडचणीत असलेले साखर कारखाने यांचा विचार करून मुन्ना महाडिक यांनी सोलापूरच्या महाजनादेश यात्रेवेळी अमित शाहच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर १५ दिवसांतच त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला (टाकळी सिकंदर, ता. माेहाेळ) सरकारने तब्बल ८५ काेटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. तसेच महाडिक यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.