मुंबई J J Hospital Doctors Strike : जे जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा (Dr Mahendra Kura) यांना रुग्णालयातून हटविण्याच्या मागणीसाठी मागील १८ डिसेंबरपासून ‘मार्ड’चे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर होते. त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या छळाला कंटाळून निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. डॉक्टर कुरा हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत जोपर्यंत जे जे रुग्णालयातून त्यांची हकालपट्टी केली जात नाही, तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला होता. गुरुवारी या त्वचा विभागातील डॉक्टरांना इतर विभागातील डॉक्टरांनी सुद्धा साथ दिली. जे जे समूहाशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयातील जवळपास ९०० डॉक्टर संपावर होते. अखेर डॉक्टर महेंद्र कुरा यांची बदली करण्यात येत असल्याची घोषणा जे जे समूहाकडून करण्यात आल्यानंतर, मार्डच्या डॉक्टरांनी गुरुवारी रात्री उशिरा संप मागे घेतला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा निष्फळ : मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील (J J Hospital) त्वचा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभारा विरोधात करत निवासी डॉक्टरांनी मागील १० दिवसांपासून सामूहिक रजा आंदोलन केले होते. आज या डॉक्टरांच्या साथीला अन्य विभागातील डॉक्टरांनी सुद्धा समर्थन दिल्यानंतर जवळपास ९०० निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. जे जे रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुरा हे निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, रुणांचे मृत्यू, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना नापास करण्याची धमकी, त्याचप्रमाणे सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि कुरा यांच्याकडून सातत्याने होणारा त्रास, अशा विविध कारणास्तव जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले होते. मागच्या मंगळवारी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सुद्धा आंदोलनकर्त्यांची चर्चा झाली. पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. अखेर हे सर्व निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले. त्याचबरोबर जोपर्यंत डॉक्टर महेंद्र कुरा यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत संप मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला होता.