पुणे -कोणी कितीही इतिहास पुसण्याचे काम केले तरी ते शक्य होणार नाही, असे विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी व्यक्त केला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मुंबईमध्ये २६/११ ( 26/11 Mumbai Attack ) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील वीरमरण आलेल्यांच्या स्मरणार्थ सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रविंद शिसवे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, यासह सर्व झोनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचनही करण्यात आले. तसेच भारत माता की जय, भारतीय संविधानाचा आम्ही आदर करु, अशा घोषणाही देण्यात आल्या.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
पोलीस बांधव हे महापूर असो भूकंप असो कि कोरोनासारखी परिस्थिती असो प्रत्येक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. आज १३ वर्षानंतर देखील मुंबई हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. कायम आपल्या सुरक्षेसाठी पोलीस काम करत असतात. आज संविधान दिन आहे. कोणी कितीही इतिहास पुसण्याचा काम जरी केला तरी ते शक्य होणार नाही. तसेच अशी विकृती ही भारतात वाढू नये. भारताच्या स्वातंत्र्याला दैदीप्यमान आणि उज्ज्वल अशी परंपरा आहे, असे मत यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.