सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथे एका सभेत बोलताना शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्याविरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या विरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यार असल्याचे म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांचे महिला आयोगाला पत्र अंधारे यांच्याकडून तक्रार दाखल :आमदार शिरसाठ यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. शिरसाट यांची वक्तव्य अत्यंत हिन आहे. शिरसाठ यांचे वक्तव्य लज्जास्पद असून अत्यंत अवमानकारक, विनयभंग करणारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे सुषमा अंधारे यांनी केली आहे.
महिला आयोगाकडून गंभीर दखल :सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या पत्राची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोग सर्व बाबी तपासून आपला योग्य तो निर्णय देईल असे राज्य महिला आयोग कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल करा : आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाण्यात दिले आहे. २६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत अवार्च्य भाषेत टीका केली होती. त्यामुळे शिरसाठ यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४(अ)अनव्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.
मी काही घाबरत नाही : महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. कोणीही आमच्यावर टीका करावी आणि आम्ही गप्प बसावे असे, होणार नाही. माझ्या विरोधात तक्रार दाखल झाली असली तरी मी काही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया शिरसाठ यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले संजय शिरसाट?छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेच्या सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. आमदरा शिरसाठ म्हणाले होते की, 'ती बाई म्हणते सगळे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ आहेत, भुमरे बंधूही माझे भाऊ आहेत. पण त्या महिलेने काय काय लफडे केले हे फक्त तिलाच माहीत', असे वक्तव्य त्यांनी केले होते.
हेही वाचा - Court Summons to Thackeray : राऊतांच्या दाव्याने ठाकरे अडचणीत; उद्धव, आदित्य ठाकरेंसह राऊतांनाही हजर राहण्याचे समन्स