मुंबई- नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकराने मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
शरद पवारांना धक्का: बारामतीचे पाणी अखेर रोखले, राजकारण पेटणार ?
नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकराने मंजूर केला आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव पाठविला होता. बारामती परिसराला देण्यात येणाऱ्या पाण्याचा करार 2017 मध्ये संपुष्टात आला आहे. नीरा डावा कालव्यातून बारामती परिसराला बेकायदा पाणी दिले जात होते. त्यामुळे हे पाणी माढा मतदारसंघाकडे वळवावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. नीरा डावा कालव्याअंतर्गत लाभक्षेत्र असलेल्या फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांना कमी पाणी मिळत होते. मात्र, आता हे पाणी या भागात वळविण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्नावर राजकारण रंगणार आहे.