मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांनाही लागू असेल. राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था आदींनाही ही अधिसूचना लागू राहील. केंद्र शासनाच्या अखत्यारितीतील स्वायत्त महामंडळे, प्रतिष्ठाने आदींनाही या अधीसूचनेनुसार सुट्टी लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात गुरुवार ११ एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी राहील.