मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा नाही तर उच्च न्यायालयाचा आहे, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे. योगा योग साधला म्हणून विरोधक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहेत, असेही ते म्हणाले.
तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.