मुंबई- दुष्काळाच्या धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत दुष्काळाचा आढावा आणि सादरीकरण घेण्यात आले. येत्या काळात मान्सून लाबंला तरी राज्य सरकार परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या परवानगीची वाट न बघता दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्या; मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना आदेश दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा छावण्यांची माहिती घेऊन दुष्काळ निवारणासाठी निविदा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने मंजूरी द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. आगामी दोन दिवसांत ही परवानगी मिळेल. मात्र, तोपर्यंत परवानगीची वाट न पाहता सर्व पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळाचा आढावा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. अल-निनोच्या प्रभावाने राज्यात मान्सूनचे आगमन लांबू शकते. तरी सरकार सर्व पातळीवर सज्ज आहे. राज्यात १२ हजार ११६ गावांमधे ४७७४ टँकर सुरू आहेत. तर १२६४ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यामधे ७.४४ लाख मोठी जनावरे आणि १ लाख लहान जनावरे अशी ८.५० लाख जनावरांना आश्रय दिला गेला आहे. एनडीआरएफने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त मोठ्या जनावरांना ९० रुपये आणि लहान जनावरांना ४५ रुपये देण्यात येते. तसेच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी ५८ हजार हेक्टरवर चारापीक घेतले असल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळी मदतीची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ८२ लाख शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांना ४४१२ कोटी दुष्काळी मदत दिली आहे. पीक विम्याचे ३२०० कोटी विमा रकमेपैकी ११०० कोटी जमा झाले आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक टँकर असून जायकवाडी धरणाच्या डेड स्टॉक मधून पाणी घेत आहोत. २०१८ च्या लोकसंख्येनुसार जीपीएस पाणी टँकर्स देत आहोत. दुष्काळी भागात अन्नधान्य कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
हवामान अंदाजानुसार अल-निनोमुळे पाऊस उशिरा येऊ शकतो. येत्या काळात तापमान कमी होईल. दुष्काळ निवारणासाठी निविदा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने मंजूरी द्यावी. येत्या दोन दिवसांत तशी परवानगी मिळेल. मात्र, तोपर्यंत परवानगीची वाट न पाहता सर्व पालकमंत्री दुष्काळी भागात जाऊन आढावा घेतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.