मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कार्यवाही सुरू आहे. त्यासंदर्भात मंडळाकडून निकाल केव्हा जाहीर केला जाईल याचे एकत्रित प्रकटन जाहीर केले जाते. मात्र, त्यापूर्वीच काही समाजमाध्यम आणि इतर माध्यमांमध्ये निकाल जाहीर होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असून अशा खोट्या बातम्या आणि त्यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी-पालकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे
दहावीच्या निकालासंबंधी अफवांचा पाऊस : मंडळाच्या घोषणेपूर्वी विश्वास ठेवू नये, शिक्षण मंडळाचे आवाहन
समाजमाध्यम आणि इतर माध्यमांमध्ये निकाल जाहीर होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असून अशा खोट्या बातम्या आणि त्यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी-पालकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा एक-दोन दिवस उशिरा लागण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या राज्यभरात या निकालासंदर्भात विविध समाज माध्यमांमध्ये निकाल जाहीर केला जात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यासंदर्भात मंडळातील अनेक अधिकाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचे हजारो फोन त्यासंदर्भातली विचारणा करण्यासाठी मंडळाकडे येत आहेत. त्यामुळे दहावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीवर याचे परिणाम होत आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली.
मंडळाच्या आजपर्यंतच्या परंपरेनुसार दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाईल, यासाठी मंडळाकडून जाहीर प्रकटन दिली जाते. त्यानंतरच निकाल जाहीर केले जातात. मात्र विविध माध्यमांमध्ये दहावीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भात आलेल्या या बातम्यांमुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमित होत असून त्यांचा त्रास मंडळाला सोसावा लागत असल्याचे खंडागळे म्हणाले. यामुळे निकालाचे जाहीर प्रकटन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माध्यमांना दिली जाणार नाही, तोपर्यंत दहावीच्या निकालासंदर्भात कुठल्याही अफवांवर पालक, विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले.