मुंबई - हे वर्ष कोरोनामध्येच गेले. त्याचा फटका अनेकांना बसला. कोरोना काळात अनेकांचा व्यवसाय बुडाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. पुढे काय होणार या विवंचनेत अनेकांचे जीवही गेले. पण, अशा काळातही काहींनी धीर गमावला नाही. जिद्द बाळगत त्यातूनही त्यांनी 'फिनिक्स भरारी' घेत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला. अशाच काही 'सक्सेस स्टोरी' बाबतचा घेतलेला हा एक आढावा.
नोकरी गेली... मात्र, परिस्थितीवर मात करत सुरू केला स्वतःचा उद्योग
अमरावती - कोरोनाच्या संसर्गामुळे देशासह राज्यात सर्वत्र टाळेबंदी झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे नोकरी गेल्याने अनेक जणांची आर्थिक कोंडी झाली होती. या काळात येवला तालुक्यातील धामणगाव येथील महेश शिवाजी गवळी या तरुणावरही तशीच वेळ आली. पण, नोकरी गेल्याने खचून न जाता परिस्थितीवर मात करत एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग सुरू केला आहे. तसेच गावातील मित्रांनाही यात सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. साठवलेल्या पैशातून एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग घरातच सुरू केला आहे. त्यासाठी लागणारे कच्चे माल विकत आणून त्याने कामाला सुरुवात केली. तयार केलेले बल्ब विकण्यासाठी मित्रांसह ग्रामीण भागात विपणणही सुरू केले आहे. अल्पदरात चांगले आणि टिकाऊ बल्ब मिळत असल्याने ग्रामीण भागात त्याला चांगली मागणी येत आहेत.
टाळेबंदीमुळे गेली नोकरी; नवा व्यवसाय सुरू करून बेरोजगार 'इंजिनिअर' झाला 'आत्मनिर्भर'
कोल्हापूर- प्रसन्न शिरदवाडे याने गेल्या वर्षी म्हणजेच 2019 साली 'इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन' या विभागातून इंजिनिअरिंग पूर्ण केली. डिग्रीनंतर लगेचच त्याला एका खासगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली. मात्र, देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू झाली. यामुळे अनेकांचे व्यवसाय, नोकऱ्यांवर परिणाम झाला. या काळात प्रसन्नलाही आपली नोकरी गमवावी लागली. त्याच्यासोबत त्याच्या काही सहकाऱ्यांचेही काम कंपनीने थोडे दिवस थांबविले. दुसरी नोकरी शोधावी तर ती सुद्धा मिळणे कठीण झाले होते. कारण, कोणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला सुद्धा परवानगी नव्हती. मग शेवटी भावाचा सुरू असलेला व्यवसाय आपणही सुरू करायचा निर्णय घेऊन प्रसन्नने 'द युनिकॉर्न' नावाच्या फास्ट फूड कॅफेची सुरुवात केली. त्याचा हा व्यवसाय सुरू असून त्यामध्ये त्याला चांगले उत्पन्न मिळत आहे.
कोरोना अन् टाळेबंदीवर मात करुन पेणचे बाप्पा गेले फॉरेनला
पेण (रायगड) - टाळेबंदी व जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करत पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती फॉरेनला गेल्या. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते. त्यातच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. अशा प्रतिकूल परिस्थितीही कलाकारांनी पेण शहरातील कला केंद्रामधून दीड ते दोन हजार गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठवल्या आहेत. इंडोनेशिया व मॉरिशसला बाप्पाच्या मूर्ती विमानाने गेल्या. तर दुबई, थायलंडसह इतर देशात मात्र समुद्रमार्गाने मूर्ती पाठवण्यात आल्या.
बाप्पाच्या मूर्तीवर रंगाचा हात फिरवताना कारागीर अडचणींवर मात करत 'रत्नागिरी हापूस' पोहोचला इंग्लंडमध्ये
रत्नागिरी- फळांचा राजा अर्थात आंबा टाळेबंदीच्या काळातही थेट सातासमुद्रापार पोहोचला. रत्नागिरी हापूस थेट इंग्लंडमध्ये गेला. जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातल्यामुळे हापूसच्या निर्यातीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, परिस्थितीवर मात करत रत्नागिरी हापूस पुण्यातील विक्रेत्याकडून हैदराबादमार्गे खासगी विमानाने इंग्लंडला पोहोचला. इंग्लंडला जवळपास 1 हजार 250 किलो हापूस निर्यात करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत 1 महिना उशिराने हा आंबा निर्यात झाला. इंग्लंडमध्ये हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रिया करुन हा आंबा पाठविण्यात येतो. आंबा इंग्लंडला पाठविण्यासाठी तेथील मराठी विक्रेते तेजस भोसले यांच्याशी येथील निर्यातदारांचा संपर्क सुरू होता. अखेर खासगी विमानाने आंबा इंग्लंडमध्ये पोहोचला.
टाळेबंदीमध्ये गेले हातचे काम, आत्मनिर्भर बनत महिलेने केली परिस्थितीवर मात
भंडारा - पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे या टाळेबंदीच्यापूर्वी खानावळ चालवीत होत्या. या खानावळीपासून त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचा नफा महिन्याकाठी होत असे. मात्र, टाळेबंदीमुळे अडीच महिन्यापासून खानावळ बंद होती. यामुले त्यांच्यावर आर्थिक संकट आले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण, त्या हरल्या नाहीत. या संकटात त्यांनी आपला जगण्याचा मार्ग शोधला. खानावळ बंद झाल्यावर त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला आणि परिस्थितीवर मात केली.
भाजी विकताना पंचायत समितीचे माजी सदस्य पुष्पा भुरे मास्क निर्मितीतून बचतगटाच्या महिलांना रोजगार
जळगाव- येथील साईधन एंटरप्राईजेस ही संस्था बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. धनंजय कीर्तने आणि अनिता कीर्तने हे संस्थेचे कामकाज सांभाळतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बचतगटाच्या महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधिक फटका अलीकडच्या काळात सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत बचतगटाच्या महिलांसाठी काय करता येईल, या विचारातून कीर्तने दाम्पत्याने पाऊल टाकले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. बाजारात दर्जेदार मास्कचा तुटवडा भासत आहे. म्हणून आपणच मास्क निर्मिती केली तर कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलता येईल, शिवाय बचतगटाच्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल. म्हणून त्यांनी मास्क निर्मिती करण्याचे ठरवले. त्यातून त्यांनी जवळपास 150 महिलांना रोजगार मिळवून दिला.
मास्क निर्मीती करताना बचतगटातील महिला कोरोना अन् निसर्ग चक्रीवादळाने केले उध्वस्त, पण जिद्दी समीर म्हात्रेने घेतली पुन्हा भरारी
रायगड -जानेवारी महिन्यात लाखोंचे उलाढाल करून तरुण उद्योजक समीर म्हात्रे याने एंटरटेनमेंट व्यवसाय सुरू केला. दोन महिने व्यवसाय उत्तम सुरू झाला आणि मार्च महिन्यापासून कोरोना महामारी सुरू झाली. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला. एवढे संकट कमी असतानाच निसर्ग चक्रीवादळाने तयार केलेले स्वप्न उध्वस्त केले. मेहनतीने बनविलेला व्यवसाय डोळ्यासमोर बेचिराख झाला. आता पुन्हा उभे कसे राहायचे हा प्रश्न उपस्थित झाला असताना पुन्हा उभारी घेण्याची जिद्द मनात धरून बेचिराख झालेला व्यवसाय समीर म्हात्रे याने पुन्हा उभारला आहे.
टाळेबंदीमुळे हप्ते थकले अन् 'तिने' रिक्षातून सुरू केला व्यवसाय
पुणे - येथील डेक्कनच्या भिडे पुलाच्या नजीक राहणाऱ्या मनोज व आशा साळुंके यांचे कुटुंब राहते. मनोज यांनी उदरनिर्वाहासाठी एक रिक्षा घेतली होती. मात्र, टाळेबंदीमुळे त्या रिक्षाचे हप्ते भरणे मुश्किल झाले. मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही प्रमाणात उद्योग-धंदे, अटींसह वाहतूक सुरू झाली. मात्र, रिक्षामध्ये दोन प्रवासी बसवून कोरोनाशी दोन हात करत उदनिर्वाह करणे परवडणारे नव्हते. रिक्षाचा उद्योग संथ गतीने सुरू झाला. पण, रोजच्या गरजा व रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे यातून जड जात होते. त्यांनी एकेदिवशी घरबसल्या काही उद्योग करता येईल का, या अनुषंगाने यूट्यूबवर शोध सुरू केला. त्यावेळी अनेक उद्योगांची माहिती त्यांना मिळाली. मात्र, त्यापैकी मटकी भेळ हा उद्योग परवडणारा होता. मग त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. घरातच रिक्षा असल्याने त्यांनी हातगाड्याऐवजी रिक्षातूनच भेळ विकण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी मटकी भेळ नेमकी कशी बनवतात याबाबत यूट्यूबरून माहिती मिळवली व बनवायला सुरू केले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रिक्षा उभी करुन हे जोडपे रिक्षातून भेळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. कमी खर्चात सुरू झालेल्या या व्यवसायातून समाधानकारक नफा मिळत असल्याचे त्या जोडप्याचे म्हणणे आहे.
मटकी भेळची विक्री करताना साळुंके दाम्पत्य कोरोना संकटात शोधली नवी संधी... सामाजिक संस्थेच्या सहायाने उभारला 'चिंच कँडी' व्यवसाय
लातूर - कोरोना व टाळेबंदीच्या कालात अनेकांचे उद्योग व व्यवसाय डबघाईला आले. लातुरातील ओमप्रकाश सारडा त्यांनाही आपले कापड दुकान बंद ठेवावे लागले होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना सोशल मीडियावर 'वाटाड्या' या सामाजिक संस्थेची माहिती मिळाली. यामधूनच सारडा यांनी चिंचेपासून बनवली जाणारी 'चिंच कँडी' घरच्या घरी बनवायला सुरुवात केली. ओमप्रकाश यांच्या पत्नीही या व्यवसायात त्यांना मदत करतात. या व्यवसायामुळे सारडा यांच्या हाताला काम तर मिळालेच, शिवाय दिवसाकाठी हजार रुपयेही त्या व्यवसायातून मिळत आहेत. या उद्योगाचे स्वरूप लहान का असेना, प्रतिकूल परिस्थितीत सारडा दाम्पत्याने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीही करून दाखविला.
चिंच कँडी बनवताना सारडा दाम्पत्य कोरोना इफेक्ट : झेरॉक्स सेंटरचा मालक विकतोय भाजीपाला, कुटूंबासाठी बदलला व्यवसाय
चंद्रपूर - कोरोरना व टाळेबंदीमुळे अनेक व्यवसायिक संकटात सापडले. अशात कुटुंबासाठी झेरॉक्स सेंटरचा मालक हातगाडीवर भाजीपाला विकत संसाराचा गाडा ओढत आहेत. हार न मानता संजय कार्लेकर यांनी व्यावसाय बदलत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. राजूरा शहरात संजय कार्लेकर यांचे झेरॉक्स सेंटर व चहाचे दुकान आहे. घरी चार विवाहित भाऊ, कुटुंबातील इतर सदस्य एकत्र राहतात. संजय यांचे भाऊ मासे विक्री करुन कुंटुंबाला हातभार लावतात. व्यवसायातून होणाऱ्या मिळकतीत कसेबसे घर चालायाचे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी झाली. यामुळे त्यांचाही व्यवसाय ठप्प झाला. कुटुंबांचे प्रश्न सोडवायचे कसे ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मात्र, परिस्थिती समोर न झूकता संजय कार्लेकर यांनी आपला व्यवसाय बदलला. दररोज कुटुंब चालविण्यासाठी येणारा खर्च काढण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भाजीपाला विक्रीने थोडीफार मिळकत त्यांना होत आहे. यातून कुटुंबाला भेडसावणारे काही प्रश्न सूटले, अशी माहिती संजय कर्लेकर यांनी दिली.
संजय कार्लेकर यांनी कुटुंबियांसाठी बदलला व्यवसाय