महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणार - शिक्षणमंत्री आशिष शेलार

ज्या‍ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांबाबत साशंकता आहे. त्यांच्यासाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देणे व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्मुल्यांकन करणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

शिक्षणमंत्री आशिष शेलार

By

Published : Jun 20, 2019, 9:19 AM IST

मुंबई- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर असलेल्या अडीअडचणी व विविध प्रश्नांबाबत शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची मा‍हिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

अजित पवार यांनी विचारलेल्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबतच्या लक्षवेधीस उत्तर देताना शिक्षणमंत्री बोलत होते. ज्या‍ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांबाबत साशंकता आहे. त्यांच्यासाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देणे व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्मुल्यांकन करणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच जे विद्यार्थी जेईई, जेईई अॅडव्हान्स या स्पर्धा परिक्षांमध्ये प्रविष्ठ झाले आहेत. त्यांच्याबाबतीत गुणपडताळणी, छायाप्रती देणे व पुनर्मुल्यांकन यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 12 वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आली होती. सदर परिक्षेचा निकाल 28 मे ला जाहीर करण्यात आला आहे. यात विज्ञान शाखेमध्ये 92.60 टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेच्या निकालाची तुलना केली असता विज्ञान शाखेच्या मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निकालामध्ये 3.25 टक्क्यांची घट झाली आहे. कॉउन्सिल ऑफ बोर्डस ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (कॉब्से) ही देशातील शैक्षणिक शिखर संस्था आहे. देशातील शालेय शिक्षणात समन्वय साधण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. कॉब्सेच्या समितीने देशपातळीवर 11 वी व 12वी साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांचा समान प्रश्नपत्रिका आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी 11 वी साठी शैक्षणिक वर्ष 2017-18 व 12 वी साठी 2018-19 पासून करण्यात आलेली आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व संबंधित प्रमाणपत्रे योग्य मुदतीत मिळावी यासाठी इतर संलग्न विभागाची बैठक तातडीने घेण्यात येईल. असेही त्यांनी विचारलेल्या उपप्रश्नास उत्तर देताना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details