मुंबई- राज्यात काँग्रेसला गुरुवारपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. त्यासाठीची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत दिली. विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने पक्षाकडून हा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असून त्याची घोषणाही उद्यापर्यंत होईल, असेही संकेत त्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या काँगेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा राजीनामा मागील काही दिवसांतच पक्षाने स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रदेश काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असून त्यासाठीच्या नावाची घोषणा उद्यापर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसकडून अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या तिकीट वापटपावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच पक्षातील विद्यमान 2 आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधीपक्षाच्या उमेदवारांचा प्रचार आणि मदतही उघडपणे केली हेाती. तर दुसरीकडे चव्हाण यांनीच चुकीच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी पुढाकार घेतल्याने राज्यात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर यश मिळाले आणि हातात असलेल्या अनेक जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्याविषयीच्या अनेक तक्रारी केंद्रीय कमिटीकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी नवीन नियुक्ती होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार सांभाळला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत व काँग्रेस विचारसरणीला न्याय देवू शकणारा व त्यासोबचत बहुजन चेहरा असलेला प्रदेशाध्यक्ष हा काँग्रेसकडून निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, हर्षवर्धन पाटील आणि बाळासाहेब थोरात आदींच्या नावाची चर्चा असल्याचे सांगण्यात येते. त्यातही थोरात यांचे नाव आघाडीवर असल्याचेही सांगण्यात आले आहे.