मुंबई- शहरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. सकाळी मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यात व रेल्वे रूळावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांचे व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प; काही शाळांना सुट्टी - top
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचे पाणी काही शाळांमध्ये शिरल्यामुळे विद्यार्थ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटाने उशिराने होत आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईतील किंग सर्कल, दादर हिंदमाता, माटुंगा या परिसरात पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाण्यात काहींच्या गाड्या अडकलेल्या आहेत. तर गुडघाभर पाण्यातून मुंबईकर कार्यालयात व शाळेत जाण्यासाठी मार्ग शोधत आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर साचल्यामुळे बेस्ट बस सेवा देखील पाणी नसलेल्या मार्गावरून वळविण्यात आलेली आहे. मुंबईत काही परिसरातील शाळांमध्ये पाणी साचल्याने शाळांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे बच्चे कंपनी शाळेसाठी बाहेर पडले असताना आता त्यांना तुंबलेल्या रस्त्यातून घराची वाट शोधत जात आहेत.