मुंबई - जागा वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना सध्या नरम झाली आहे. भाजप जेवढ्या जागा देईल, तेवढ्या जागा घेण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे चित्र दिसत आहे. रविवारी मुंबईत भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेची धाकधुक वाढली आहे. शिवसेना भाजपच्या मागे फरफटत जात असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. त्यांच्या या फरफटण्याचा अजोड नमुना म्हणजे आजचा सामनाचा अग्रलेख, वेगळे काय घडेल? दाबा बटण!
नाशिकमध्ये राम मंदिरावरुन टोला
निवडणुकीची घोषणा होण्याआधी आणि नंतर भाजपने दोन मोठे इव्हेंट गेल्या ४ दिवसात केले. नाशिकच्या सभेत ना मोदींनी शिवसेनेचे नाव घेतले ना भाजपच्या एकाही नेत्याने. तरीही शिवसेना युतीची चर्चा सुरु असल्याचे वारंवार सांगत आहे. त्याचवेळी भाजपकडून कोणी महत्त्वाचा पदाधिकारी समोर येऊन त्याबद्दल सांगत असल्याचे दिसत नाही. नाशिकमधील सभेत मोदींनी शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी, राम मंदिराबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले, तो टोला शिवसेनेलाच होता, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. मोदी म्हणाले, 'काही बयाण बहादूर - बडबोले हे अनाब शनाब बयानबाजी करत आहेत'. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी शिवसेना भवनात उद्धव यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना पंतप्रधानांच्या वाक्-बाणाची आठवण करुन देण्यात आली. त्यावर त्यांचे उत्तर हे हस्यास्पद होते. मी बयाणबाज नाही. मोदी मला उद्देशून बोलले नाही. असे बाळबोध उत्तर ठाकरेंनी दिले. त्याचवेळी उद्धव ठाकरे स्पष्टपणे हेही सांगू शकले नाहीत की त्यांची किती जागांची मागणी आहे. लोकसभेत फॉर्म्युला ठरला आहे, याचीच री ते शेवटपर्यंत ओढत राहीले.
शनिवारी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी अमित शाहांचा मुंबईत मेगा इव्हेंट झाला. 'कलम ३७० आणि ३५ ए रद्द' यावर शाहांचे व्याख्यान, असा हा कार्यक्रम होता. नाशिक प्रमाणेच याही कार्यक्रमात जिकडे-तिकडे फक्त आणि फक्त भाजप होते. शिवसेनेच्या नेत्यांना देशाच्या एवढ्या मोठ्या निर्णयावर आयोजित व्याख्यानाचे निमंत्रणही नव्हते का? एकंदर भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात शिवसेना दिसत नाही. मात्र, त्याचवेळी शिवसेनेच्या वर्धापन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतात. सेनेच्या मंचावर येऊन ते सांगतात की जंगलचा राजा एकच असतो. यावरुन काय समजायचे ते समजदारांना वेगळे सांगायची गरज नाही.
देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री
रविवारच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना आजपर्यंत अडीच-अडीच वर्षे दोन्ही पक्षाचे मुख्यमंत्री होतील असे सांगत होती. मात्र, शाह यांच्या कालच्या विधानावरुन शिवसेनेला त्यांनी अप्रत्यक्षरित्या इशाराच दिल्याचे समजते. तसेच शाह हे मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा जोर धरत होती. मात्र, शाह यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तसेच संपूर्ण भाषणात त्यांनी युतीचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे युतीचा तिढा कायम असल्याचे दिसते आहे.