मुंबई :बुलडाणा जिल्ह्यात एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्याने वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. औरंगजेबला हिरो बनवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून वारंवार केला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी : या मुद्द्यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, 'बुलडाण्याच्या ओवैसी यांच्या सभेत औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. काँग्रेस, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, ओवैसी, प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष तसेच समाजवादी पक्ष, सगळेच मुस्लिम मतांसाठी आता औरंगजेबाला हिरो बनवणार आहे का? महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. महाराष्ट्र हे कधीच स्वीकारणार नाही. या प्रकारे औरंगजेबाला हिरो बनवणाच्या प्रवृत्तींवर कारवाई होणारच, असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. तसेच किरीट सोमय्या यांनी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी बोलून या प्रकरणी लवकरात लवकर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.