महाराष्ट्र

maharashtra

SIT Inquiry : शिंदे सरकारने 'या' नऊ प्रकरणात एसआयटी नेमली; कार्यवाही गुलदस्त्यात

By

Published : Jun 24, 2023, 7:40 PM IST

राज्यात एखादी घटना घडली तर त्याची लगेच एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून दिले जातात. मात्र, पुढे जाऊन त्या चौकशांचे काय होते हे अनेकदा समोर येत नाही. शिंदे सरकारनेही विविध नऊ प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. मात्र, त्याचा अहवाल अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून विविध नऊ प्रकरणात एसआयटी समिती नेमली. या समितीचा अहवाल लवकर जाहीर करण्याच्या सुचना दिल्या. मात्र, चौकशीचा अहवाल आणि कार्यवाही अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजते.

  1. प्रकाश सुर्वे-शितल म्हात्रे प्रकरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने ठाकरेंना शह देण्यासाठी मुंबईत यात्रा काढण्यात आली. दहिसर येथील मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडीओ मोर्फ केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी युवासेनेचे सोशल मिडीया प्रमुखांसह सात जणांना अटक केली. विधीमंडळात हा मुद्दा चांगलाच गाजला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी समिती नेमली. जानेवारी महिन्यांत नेमलेल्या या एसआयटीची कार्यवाही थंडावल्याचे समजते. तर पोलिसांना मुळ व्हिडीओच मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे मोर्फ व्हिडीओचा शोध लावायचा कसा, असा पेच पोलिसांसमोर आहे.
  2. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण - सिने- अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यू प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने केला होता. तसेच एनसीबी मार्फत चौकशी सुरु केली. तब्बल दोन वर्षे एनसीबीने चौकशी केली. मात्र, राज्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोरी करत, भाजपच्या मदतीने सत्तेवर आले. पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे प्रकरण चव्हाट्यावर आले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आरोप करत एसआयटी नेमण्याची मागणी केली. गृहमंत्री फडणवीस यांनी समिती नेमली. समितीने चौकशीला सुरुवात केली. परंतु, अद्याप अहवाल समोर आलेला नाही.
  3. महाराष्ट्रभूषण सोहळा प्रकरण - ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाचा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार दिला. दरम्यान, चेंगराचेंगरीमुळे 16 निष्पापांचा जीव केला. सरकारच्या हलगर्जीपणा यामुळे समोर आला. विरोधकांनी यावरुन जोरदार टीकास्त्र सोडले. राज्य शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती नेमली. समितीचा कारभार थंडावला आहे. निष्पाप जीवांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
  4. त्र्यंबकेश्वर धूप प्रकरण - नाशिक येथील सुप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल निमित्त घुसण्याचा प्रकार घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मुस्लिम समाजाकडून हा आरोप फेटाळण्यात आला. दरवर्षी धूप दाखवण्याची पूर्वापार आलेली पद्धत आहे. परंतु, जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतोय, असे स्पष्टीकरण देण्यात आले. भाजप आमदार नितेश राणेंनी या प्रकरणी एसआयटी नेमावी अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने एसआयटी चौकशीचे आदेश दिले. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. समितीच्या कार्यवाहीचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात आहे.
  5. रामनवमी दंगल प्रकरण - औरंगाबाद येथे रामनवमी कार्यक्रमादरम्यान जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले. सुमारे 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच राज्य शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती नेमली. समितीचा अहवाल अद्याप लालफितीत आहे.
  6. किशोर आवारे हत्या प्रकरण - पुण्यातील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची हत्या झाली. सहा आरोपींना पोलिसांनी यानंतर अटक केली. पोलीस आयुक्तांनी एसआयटी नेमली. समितीकडून प्रकरणाचा तपास सुरु आहे.
  7. पेपर फुटी प्रकरण - राज्यात दहावी, बारावी परिक्षेपूर्वी परिक्षा मुक्त अभियान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने राबवले. बारावीच्या परीक्षे दरम्यान, बुलढाण्यात पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला. दोन शिक्षण आणि पाच तरुणांना यावेळी अटक करण्यात आली. तसेच पेपरफुटीचे धागेदोरे शोधण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती नेमली. समितीकडून तपास सुरु आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरही कार्यवाहीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
  8. पत्रकार हत्या प्रकरण - रत्नागिरी येथील महानगरी टाईम्स दैनिकाचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात असला तरी हत्या असल्याचा आरोप कुटुंबिय आणि पत्रकार संघटनांकडून करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी वाहन चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली. तसेच फास्ट ट्रकवर खटला चालवण्यासाठी राज्य शासनाने 11 सदस्यीय एसआयटी समिती नेमली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कारवाईला गती देणार असल्याची घोषणा केली. परंतु, तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप एसआयटी चौकशीचा रिपोर्ट जाहीर झालेला नाही.
  9. राहुल शेवाळे बलात्कार आरोप प्रकरण - एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी आमदार मनीषा कायंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी केली होती. संबंधित प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी चौकशीसाठी एसआयटी समिती नेमण्याचे आदेश दिले. शिंदे सरकारने समिती नेमली. परंतु, अद्याप एसआयटीचा अहवाल समोर आलेला नाही.

विरोधकांची टीका - शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ चौकशी समिती नेमत आहे. एका ही प्रकरणाचा अहवाल समोर आलेला नाही. केवळ पळवाट काढण्यासाठी सरकारने एसआयटी समित्या नेमल्या आहेत. अनेक प्रकरण शिंदे गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. समित्यांच्या चौकशीचा अहवाल समोर येईल, हा प्रश्न आहे. मात्र, सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details