मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्यासाठी शिवसेनेचा कडवा विरोध असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने पोस्टरबाजी करुन भुजबळांना विरोध दर्शवला आहे. साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्राची जनता विसरणार नाही, आपण आहे तिथेच रहा अशा आशयाचे पोस्टर शिवसैनिकांनी भुजबळांच्या विरोधात लावले आहेत.
छगन भुजबळ हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांनी नगरसेवक, मुंबईचे महापौरपद भूषविले होते. नंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस फुटून राष्ट्रवादीचा जन्म झाल्यावर भुजबळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. सध्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, आपण शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
काल मुंबई अध्यख सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान भुजबळ सुद्धा शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र भुजबळ यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार ही अफवा असून आहे त्याच ठिकाणी राहणार असल्याचे स्पष्ट केले.