मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. हे वर्ष शिवसेनेसाठी अभूतपूर्व असून, गेल्या वर्षी 20 तारखेला क्रांतीला सुरुवात झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
'तुमच्यावर किती केसेस झाल्या?' : एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, 'शिवसेना नेत्यांच्या कष्टातून उभारली आहे, तुम्ही त्यांनाच हिणवले. आम्ही पक्षासाठी मेहनत घेतली. शिवसेनेसाठी कितीतरी लोकांनी जीव दिला, तुमच्यावर किती केसेस झाल्या? मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. यामागे माझे कष्ट आहे. मी कर्ज काढून निवडणुका लढल्या. बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस काढले. त्यानंतर शिवसेना मोठी झाली, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे भावूक झाले : भाषणादरम्यान एकनाथ शिंदे भावूक झाले. ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीच्या वेळी आई गेली तरी मी सभा घेतली. सभेनंतर आईचे अंतिम दर्शन घेतले. मला रडून चालणार नाही, मला लाखोंचे अश्रु पुसायचे आहेत'. ते पुढे म्हणाले की, 'आज मुख्यंमंत्री झालो तरी माझ्यात काही बदल झाला नाही. मी पहिल्याप्रमाणेच आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे'.
'तुम्हीच गद्दारी केली, फक्त तारीख विसरलात' :एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही जर चुकीचा निर्णय घेतला असता तर 50 आमदार, 13 खासदार आणि शेकडो कार्यकर्ते आमच्या सोबत आले नसते'. हे सर्व जोपर्यंत तुमच्याकडे होते तोपर्यंत ते चांगले होते, आता कचरा कसे झाले?, असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
'सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेस चालवत होतं' : महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, पण सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेस चालवत होतं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाच निधीचे वाटप केले गेले.' मुख्यमंत्री सहायता निधी वर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात 2 कोटी निधींचे वाटप केले, आम्ही 75 कोटी वाटले'. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना, घरी बसून सरकार चालवता येत नाही, असा टोला देखील लगावला.
'प्रत्येक निवडणूक भाजपसोबत लढणार' : मोदी मणिपूरला का जात नाही? या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी, मोदींनी पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केली, तुम्ही मात्र वर्षावरून मंत्रालयात गेले नाही, असा टोला लगावला. मोदींनी बाळासाहेबांचे राम मंदिराचे व कलम 370 हटवण्याचे स्वप्न साकार केले, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच येणारी प्रत्येक निवडणूक भाजपसोबत युतीतच लढणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
हेही वाचा :
- Shivsena UBT anniversary : 'इथे गर्दी तर तिथे गारदी' उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, भाजपची राज्य करण्याची लायकी नसल्याचा घणाघात